कराड नगरपालिकेची पहिली विशेष अर्थसंकल्पीय सभा स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी
कराड/प्रतिनिधी : –
कराड नगरपालिकेच्या नव्या लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांनी कार्यारंभाला ऐतिहासिक आणि भावनिक स्वरूप देत एक अनोखा निर्णय घेतला आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पवित्र समाधीस्थळी नगरपालिकेची पहिली विशेष व अर्थसंकल्पीय सभा घेण्याचा निर्णय नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी जाहीर केला आहे.
शुक्रवारी (दि. २७) रोजी दुपारी ४ वाजता ही सभा प्रीतिसंगम येथील स्व. चव्हाण यांच्या समाधी परिसरात पार पडणार आहे. नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच अशी सभा समाधीस्थळी होत असल्याने या निर्णयाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
कराड हे सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असून, कृष्णा-कोयना नद्यांच्या संगमामुळे ‘प्रीतिसंगम’ म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी स्व. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ असून राज्याच्या राजकीय इतिहासात या स्थळाला विशेष स्थान आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या चव्हाण साहेबांना स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचे जनक मानले जाते.
२०२२ पासून नगरपालिकेवर प्रशासक राज लागू होता. अलीकडेच झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक लोकनियुक्त झाल्यानंतर आता प्रत्यक्ष लोकशाही कारभाराला प्रारंभ होत आहे. या कार्याची सुरुवात स्व. चव्हाण यांना अभिवादन करून करण्याचा निर्णय नगराध्यक्ष यादव यांनी घेतला आहे.
आपण कोणतेही शुभकार्य करताना आई-वडिल व थोरांना वंदन करतो. स्व. यशवंतराव चव्हाण हे केवळ कराडचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचा कारभार पुढे नेऊ, असे मत नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त केले.
या निर्णयावेळी उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, नगरसेवक जयंतकाका पाटील व मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर उपस्थित होते. नगरपालिकेच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून, कराडच्या राजकीय व सांस्कृतिक परंपरेला साजेसा निर्णय म्हणून त्याचे कौतुक केले जात आहे.



