पालकर शाळेत रक्षाबंधन उत्साहात साजरा

कराड/प्रतिनिधी –
कै. सौ. अनुसया काशिनाथ पालकर आदर्श शिशुविहार, कराड येथील बालवाडीत रक्षाबंधन सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी तसेच भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे नाते अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाचे महत्त्व सांगण्यात आले. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्य, सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो. नारळी पौर्णिमेचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमात मुलींनी मुलांचे औक्षण करून त्यांच्या मनगटावर राखी बांधली. त्यानंतर मुलांनी बहिणींना भेटवस्तू देऊन रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचा सुंदर अनुभव मिळाला.
बालवाडी विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला.


