सातारा जिल्हाहोम

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती कराडमध्ये उत्साहात साजरी 

कराड/प्रतिनिधी : – 

थोर साहित्यिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कराड शहरात शनिवारी उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण पाहायला मिळाले. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, पदाधिकारी, तसेच नागरिकांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून अण्णाभाऊंच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन केले.

शहरातील बुधवार पेठ व महात्मा फुले नगर परिसरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला आमदार डॉ. अतुल भोसले, कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांच्यासह विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अण्णाभाऊंच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजातील शोषित, वंचित, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या व्यथा, वेदना आणि संघर्षाला प्रभावीपणे वाचा फोडली. त्यांच्या लेखणीला सामाजिक परिवर्तनाची धार होती. शाहिरी आणि साहित्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक विषमता, अन्याय आणि शोषणाविरोधात जनजागृती केली.

सामाजिक समता, न्याय, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा संदेश देणारे अण्णाभाऊंचे विचार आजच्या काळातही तितकेच प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेत समाजाप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.

दरम्यान, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील त्यांच्या जन्मगाव वाटेगाव येथून आणण्यात आलेल्या प्रेरणा ज्योतीचे कराड शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. या प्रेरणा ज्योतीला अभिवादन करण्यासाठी नागरिक, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर ज्योतीची शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी प्रेरणा ज्योतीचे स्वागत करून अभिवादन केले.

जयंतीनिमित्त कराड शहरातील विविध पक्ष, सामाजिक व विविध संघटनांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच नागरिकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला भेट देत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Related Articles