मलकापूरच्या विकासाला आता जागतिक बँकेचे बळ!
३० वर्षे निधीची कमतरता भासणार नाही; कराड दक्षिण मतदारसंघ ‘वीज बिलमुक्त’ करणार - आ. अतुल भोसले
कराड/प्रतिनिधी : –
मलकापूर शहराच्या वेगवान विकासाला आता जागतिक बँकेच्या योजनांचे बळ मिळणार असून, या योजनांमध्ये मलकापूरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी ३० वर्षांच्या विकासासाठी शहराला निधीची कमतरता भासणार नाही, अशी माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
मलकापूर शहर वीज बिलमुक्त अभियान, तसेच संकलित करामध्ये १० टक्के सवलत देण्याच्या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल डॉ. सुरेशबाबा भोसले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी होते.
आ. डॉ. भोसले म्हणाले, मलकापूरचा विकास सध्या वेगाने सुरू असून भविष्यात ही गती आणखी वाढणार आहे. त्यामुळे शहराचे रूपांतर मोठ्या शहरात होण्यास वेळ लागणार नाही. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन मलकापूरच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, भुयारी गटार तसेच अन्य नागरी सुविधांच्या जुन्या योजनांचा विस्तार व आधुनिकीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.
मलकापूरची २४ बाय ७ नळ पाणीपुरवठा योजना देशभरात आदर्श ठरली आहे. आता जागतिक बँकेच्या योजनांच्या माध्यमातून या योजनेचे ‘अल्ट्रा मॉडर्न’ स्वरूपात रूपांतर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच भुयारी गटार योजनेच्या विस्तारासाठीही निधी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मलकापूरला ‘सोलर सिटी’ बनविण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी शहरातील घरांचा सर्वेक्षण करून प्रत्येक घरासाठी योग्य सौरऊर्जा प्रणाली निश्चित करण्याचे काम सुरू आहे. ‘पीएम सूर्य घर’ योजनेच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघ वीज बिलमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत मतदारसंघातील १ हजार १२३ घरांवर सौर पॅनेल बसविण्यात आले असून, केंद्र शासनाच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांची सबसिडी मतदारसंघात आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे आ. भोसले यांनी सांगितले.
मलकापूर शहरातील २३८ घरांवर सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत. शहरातील ७० टक्के घरांवर सौर पॅनेल बसविण्यात यश आल्यास मलकापूरला पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार असून, पंतप्रधानांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्याची संधी शहराला मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, २४ बाय ७ नळ पाणीपुरवठा योजना हा मलकापूरचा ब्रँड बनला आहे. आता त्याच धर्तीवर ‘वीज बिलमुक्त मलकापूर’ हा नवा ब्रँड निर्माण करण्याची गरज आहे. मलकापूरमध्ये शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध असून, राज्यातील विकसित शहर म्हणून मलकापूरची ओळख निर्माण झाली आहे.
सुभाषराव जोशी म्हणाले, मलकापूरमध्ये लोककल्याणकारी योजना राबवून त्या यशस्वी करण्याची परंपरा आहे. नागरिकांचा विकासकामांना नेहमीच सहकार्याचा हात असतो. भविष्यातही मलकापूरचा विकास याच गतीने सुरू राहील.
मनोहर शिंदे यांनी, मलकापूरच्या विकासातील कृष्णा हॉस्पिटल आणि ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत झालेले रूपांतर या दोन महत्त्वपूर्ण टप्प्यांचा उल्लेख केला. मलकापूरच्या विकासात भोसले व चव्हाण कुटुंबीयांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. सुरेश भोसले यांचा विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन शहरवासीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ज्ञानदेव साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय येडगे यांनी आभार मानले.यावेळी बाजीराव जाधव, बी. टी. मोहिते, नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी कपिल जगताप, सुरज शेवाळे, धनंजय येडगे, गीतांजली पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व नागरिक उपस्थित होते.



