स्व. अजितदादा पवार जयंती व अॅड. उदयसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कराड तालुका आणि रयत संघटनेच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त, तसेच जि. प. सदस्य व रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दि. २१ व २२ जुलै रोजी कोयना सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात हे शिबिर पार पडले. लोकनेते स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर प्रवेशद्वार, मार्केट यार्ड येथे झालेल्या या शिबिरास युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, कोयना सहकारी बँकेचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
शिबिरास कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, नगरसेवक विजय यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, माजी सभापती अप्पासो गरुड, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, प्रा. धनाजी काटकर, पै. आनंदराव मोहिते, माजी नगरसेवक अजित थोरात, नगरसेविका मृणालिनी इंगवले, राजेश पाटील-वाठारकर, सुनील पाटील, सभापती पै. सतीश इंगवले, संग्रामसिंह देशमुख, कोयना दूध संघाचे अध्यक्ष बाबुराव धोकटे, कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष के. टी. पाटील, उपाध्यक्ष साहेबराव शेवाळे, कराड खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अनिल मोहिते, उपाध्यक्ष जगन्नाथ मोरे, शामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष शहाजी शेवाळे, भागवतराव कणसे, पांडुरंग पाटील (तात्या), रोहित पाटील, जयसिंग चव्हाण, महेशकुमार जाधव, विजय मुठेकर, मोहनराव माने, नितीन ढापरे, कोयना दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजी जाधव, मलकापूरचे नगरसेवक भीमाशंकर माउर व दादासो शिंगण, जिल्हा परिषद सदस्य लालासो जगदाळे, प्रमोद पाटील, पंचायत समिती सदस्य दिनेश कुंभार, कराडचे नगरसेवक नरेंद्र लिंबे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे प्रोत्साहन वाढविले.
यावेळी मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत निरोगी नागरिकांनी नियमित रक्तदान करून गरजू रुग्णांच्या जीवनरक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला अभिवादन करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कराड तालुका, रयत संघटना, कोयना सहकारी बँक प्रशासन, अक्षय ब्लड बँकेचे वैद्यकीय पथक, स्वयंसेवक आणि रक्तदाते यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.



