महिला सक्षमीकरणातून समाजाचे सक्षमीकरण – विद्याताई वेताळ

कराड/प्रतिनिधी : –
महिलांचे सक्षमीकरण म्हणजे केवळ एका कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा पाया मजबूत करणे होय. समाजातील प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार असून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक पात्र भगिनीपर्यंत पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ. विद्याताई वेताळ यांनी केले.
तहसील कार्यालय कराड, पंचायत समिती कराड आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह (बचत भवन), कराड येथे एकल महिला दिनानिमित्त आयोजित एकल व विधवा महिलांसाठीच्या विशेष शिबिरात त्या बोलत होत्या.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. नंदाताई यादव, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदा पाटील, सौ. थोरात मॅडम, गटविकास अधिकारी श्री. प्रताप पाटील, पंचायत समिती सदस्य मा. संग्रामबाबा पवार, मा. सिद्धार्थ चव्हाण, श्री. आनंदा थोरात, सौ. शितल कुंभार, सौ. वैशाली पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
सौ. वेताळ म्हणाल्या, अनेक महिला प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आत्मविश्वासाने जीवन जगत आहेत. अशा महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळणे आणि त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळणे आवश्यक आहे. महिलांच्या आर्थिक, सामाजिक व वैयक्तिक सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवत असून अशा शिबिरांच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांची माहिती तसेच विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जात आहे.
या विशेष शिबिरात एकल व विधवा महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेऊन संबंधित विभागांकडून मार्गदर्शन करण्यात आले. महिलांच्या सुरक्षितता, स्वावलंबन आणि आर्थिक उन्नतीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमास कराड तालुक्यातील विविध भागांतील एकल व विधवा महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ प्रत्येक पात्र भगिनीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.


