सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्यात तिसऱ्यांदा सहकार पॅनलची सत्ता 

डॉ. सुरेश भोसले यांना सभासदांची पसंती; संस्थापक पॅनेलचा २१-० ने पराभव 

कराड/प्रतिनिधी : – 

पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने अभूतपूर्व विजय मिळवत कारखान्यावरील आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवत सहकार पॅनेलने विरोधी संस्थापक पॅनेलचा अक्षरशः धुव्वा उडवला. या निकालामुळे डॉ. भोसले यांनी सलग तिसऱ्यांदा कारखान्याची सत्ता राखत विजयाची हॅट्रिक पूर्ण केली.

निवडणुकीच्या निकालाने कृष्णा कारखान्याच्या राजकारणात एकतर्फी चित्र स्पष्ट झाले. सहकार पॅनेलच्या प्रत्येक उमेदवाराने सरासरी १५ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजय मिळविल्याने सभासदांनी विद्यमान नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वासाचा कौल दिल्याचे अधोरेखित झाले. २०१४ पासून कारखान्याच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या डॉ. सुरेश भोसले यांच्या कार्यपद्धतीला आणि विकासाच्या भूमिकेला सभासदांनी दिलेली ही मोठी पावती मानली जात आहे.

कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी तब्बल ८२.२६ टक्के मतदान झाले होते. या विक्रमी मतदानामुळे निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मंगळवारी सकाळी कराड येथील कार्वे नाका परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला प्रारंभ झाला.

मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून सहकार पॅनेलने स्पष्ट आघाडी घेत विजयाची दिशा निश्चित केली. पहिल्या टप्प्यात १ ते ७७ मतदान केंद्रांवरील सुमारे १७ हजार ५०० मतांची मोजणी करण्यात आली. या फेरीतच सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी साडेसात हजार मतांची भक्कम आघाडी घेतली होती. त्यामुळे निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले होते. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील मतमोजणीत ही आघाडी आणखी वाढत गेली आणि अखेर सर्व २१ जागांवर सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी विजयाची मोहर उमटवली.

अंतिम निकाल जाहीर होताच मतमोजणी केंद्राबाहेर आणि कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जल्लोषाला सुरुवात झाली. कराड, रेठरे बुद्रुकसह विविध गावांमध्ये कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली, फटाक्यांची आतषबाजी केली आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. अनेक ठिकाणी विजयी मिरवणुका काढून समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.

या निकालामुळे कृष्णा कारखान्याच्या राजकारणात डॉ. सुरेश भोसले यांचे नेतृत्व अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे. सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या या दणदणीत विजयामुळे कारखान्याच्या भविष्यातील धोरणात्मक निर्णयांमध्ये सहकार पॅनेलची पकड अधिक मजबूत होणार असल्याचे राजकीय व सहकार क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. सभासदांनी विकास, स्थैर्य आणि सातत्यपूर्ण नेतृत्वाला पसंती देत पुन्हा एकदा भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याचे या निकालातून स्पष्ट झाले.

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार : 

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. १ (वडगाव हवेली – दुशेरे) : धोंडीराम जाधव (दुशेरे) – 24868, जगदीश जगताप (वडगाव हवेली) – 23768, आनंद खबाले (विंग) – 24108

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. २ (कार्वे – काले) : अरविंद पाटील (आटके) – 24851, दयाराम पाटील (काळे) – 24108, बाजीराव थोरात (काले) – 23475

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ३ (तांबवे – नेर्ले) : दत्तात्रय देसाई (वाठार) – 24678, लिंबाजी पाटील (तांबवे, वाळवा) – 24044, संभाजीराव पाटील (नेर्ले, वाळवा) – 23963

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ४ (बोरगाव – रेठरे हरणाक्ष) : जयवंत मोरे (रेठरे हरणाक्ष) – 24639, सत्यजित पाटील (बोरगाव) – 24040, सुनील पाटील (कामेरी) – 23957

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ५ (येडेमच्छिंद्र – वांगी) : संग्राम पाटील (येडेमच्छिंद्र) – 24172, बाबासो शिंदे (देवराष्ट्रे) – 22953

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ६ (रेठरे बुद्रुक – शेणोली) : सुरेश भोसले (रेठरे बुद्रुक) – 24809, बाजीराव निकम (शेरे) – 21925

महिला राखीव गट : सुजाता जाधव (कापील) – 23479, सुनीता शेवाळे (सवादे) – 21874

अनुसूचित जाती-जमाती राखीव गट :

छबन कांबळे (कोळे) – 24658

भटक्या विमुक्त जाती व जमाती / विशेष राखीव गट : अविनाश खरात (खरतवाडी) – 24515

इतर मागास प्रवर्ग राखीव गट : बाळासो जगताप (कोडोली) – 25010

संस्थापक पॅनलचे उमेदवार : 

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. १ (वडगाव हवेली – दुशेरे) : आनंदा तुकाराम जगताप – 10208, प्रताप धोंडीराम जगताप – 10048, दुर्योधन पांडुरंग खबाले – 9437

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. २ (कार्वे – काले) : संतोष नागनाथ पाटील – 10022, प्रतापराव वसंतराव पाटील – 10363, शांताराम शंकर पाटील – 9802

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ३ (तांबवे – नेर्ले) : सुरेश / सुभाष बाबुराव पाटील – 9944, सुभाष उद्धव पाटील – 10317, किरण दिलीप पाटील – 10089

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ४ (बोरगाव – रेठरे हरणाक्ष) : जयकर शिवाजी शिंदे – 9925, महेश अशोकराव पाटील – 10116, उदयसिंह प्रतापराव शिंदे – 9819

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ५ (येडेमच्छिंद्र – वांगी) : माणिकराव आनंदराव मोरे – 10194, सुरेश गणपती पाटील – 10060

सर्वसाधारण ऊस उत्पादक गट क्र. ६ (रेठरे बुद्रुक – शेणोली) : अविनाश जगनाथ मोहिते – 11456, दीपक रामचंद्र (धोंडी) कणसे – 9677

महिला राखीव गट : अर्चना अविनाश मोहिते – 11896, विजया उत्तमराव पाटील – 10217

अनुसूचित जाती-जमाती राखीव गट :

सुधीर गोविंद रोकडे – 10599

भटक्या विमुक्त जाती व जमाती / विशेष राखीव गट : दिलीप तुकाराम गलांडे – 10561

इतर मागास प्रवर्ग राखीव गट : प्रकाश बाळकृष्ण श्रीखंडे – 10276

Related Articles