तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत;सचिवपदावरून हटवले; आयुक्तपदी कायम

मुंबई / विशेष प्रतिनिधी :-
प्रशासकीय शिस्त आणि धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबाबत प्रशासकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
राज्यातील धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी बेकायदेशीर कामकाजाविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे.
त्यांच्या कारवाईमुळे अनेक खाद्यपदार्थ विक्रेते, उत्पादक, औषध विक्रेते आणि कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशातच राज्य सरकारने त्यांच्या एका महत्त्वाच्या पदावरील नियुक्तीत बदल केल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार तुकाराम मुंढे यांना परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदावरून हटविण्यात आले आहे. मात्र, ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कायम राहणार आहेत.
मुंढे यांची 23 फेब्रुवारी 2026 रोजी परभणीच्या पालक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी ते दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव होते. त्यानंतर त्यांची FDA आयुक्तपदी नियुक्ती झाली आणि आता पालक सचिवपदावरील जबाबदारी काढून घेण्यात आली आहे.
परभणी आणि अकोल्याला नवे पालक सचिव तसेच अकोला जिल्ह्याच्या पालक सचिवपदातही बदल करण्यात आला असून परिमल सिंह यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी सौरभ विजय यांची जागा घेतली आहे.
पालक सचिव पदाचे महत्त्व काय?
पालक सचिव हे राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानले जातात. शासनाच्या विविध योजना, विकासकामे आणि कल्याणकारी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही यावर ते लक्ष ठेवतात.
यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना वर्षातून किमान चार वेळा जिल्हा दौरे करणे, योजनांचा आढावा घेणे, अडचणी ओळखून उपाययोजना सुचवणे आणि शासनाला अहवाल सादर करणे आवश्यक असते.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीतील या बदलामुळे प्रशासकीय क्षेत्रात विविध चर्चांना सुरुवात झाली असून आगामी काळात त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



