सातारा जिल्हाहोम

धैर्यशील कदम यांचा विजय ऐतिहासिक – ना. जयकुमार गोरे 

शिवतीर्थ व यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन 

कराड/प्रतिनिधी : – 

सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजयाची नोंद करत पहिल्यांदाच आपला उमेदवार निवडून आणला आहे. भाजप-महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी ३०१ मतांच्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे. या विजयामागे सातारा व सांगली जिल्ह्यातील भाजपच्या खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे सामूहिक योगदान असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

विजयानंतर आमदार धैर्यशील कदम यांनी कराड येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास, तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर भाजप कराड शहर, उत्तर व दक्षिण मतदारसंघांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माध्यमांशी संवाद साधताना मंत्री गोरे म्हणाले, या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी आणि मतांचे गणित आम्ही निश्चितच तपासणार आहोत. विविध पातळ्यांवर अनेक प्रकारची समीकरणे आणि भूमिका या निवडणुकीत दिसून आल्या. काहींच्या मनात एक, पोटात एक आणि प्रत्यक्ष कृतीत वेगळी भूमिका होती; मात्र त्याचा महायुतीच्या विजयावर परिणाम झाला नाही.

पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या भूमिकेबाबत विचारले असता गोरे म्हणाले, त्यांनी काय भूमिका घेतली, हे त्यांना आणि देवालाच माहिती. मात्र महायुती म्हणून आम्ही एकत्र होतो. ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची, हा भाजपचा निर्धार होता आणि त्यात आम्हाला यश मिळाले आहे. कदम यांचा विजय हा अपेक्षित मताधिक्यासह मिळाला असल्याचे सांगत गोरे म्हणाले, आम्हाला आणखी काही मतांची अपेक्षा होती. निवडणुकीत चढ-उतार होत असतात; मात्र ३०१ मतांचे मताधिक्य हे निश्चितच ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले.

कराड उत्तर व दक्षिण मतदारसंघातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा उल्लेख करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा पुनरुच्चार केला. विकासाच्या राजकारणाला जनतेने पसंती दिली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यातील मतदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.

राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडी आणि इतर पक्षांतील लोकप्रतिनिधींच्या महायुतीकडे वाढत्या ओढीबाबत बोलताना गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची गती वाढली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांतून निवडून आलेल्या अनेक खासदार-आमदारांचाही महायुतीवरील विश्वास वाढत आहे. यामुळेच महायुतीत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे.

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचा निर्धार व्यक्त करताना त्यांनी, हा विजय केवळ माझा किंवा एखाद्या नेत्याचा नाही. जिल्ह्यातील खासदार, मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फलित आहे. आता सर्वांनी मिळून साताऱ्याच्या विकासासाठी अधिक वेगाने काम करू, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांनीही विजयाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, गेली तीन दशके सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहे. भाजपने जिल्हाध्यक्षपदासह विविध जबाबदाऱ्या दिल्या. आज विधानपरिषद आमदार म्हणून निवडून येण्याची संधी मिळाली. भाजप आणि महायुतीतील सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे.

उमेदवारीपासून विजयापर्यंत सर्वच नेत्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणी काय दिले, यापेक्षा भाजप-महायुती सरकारने मला आमदार होण्याची संधी दिली, याचे समाधान अधिक आहे. महायुतीतील सर्व नेत्यांनी एकजुटीने मतदान केले असून, आमची मते फुटली नसून, माझा कोणावरही आक्षेप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

२००७ पासून कराड उत्तर मतदारसंघात मी सातत्याने काम करत आहे. २००९ मध्ये डॉ. अतुल भोसले यांच्यामुळे मला थांबावे लागले. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत कमी फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्या काळात कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे आणि माझ्यात राजकीय संघर्ष होता. मात्र नेते जयकुमार गोरे यांनी मध्यस्थी करत आम्ही दोघेही भविष्यात आमदार होऊ, असा शब्द दिला होता. त्या शब्दानुसार २०२४ मध्ये मनोज घोरपडे आमदार झाले. जयकुमार गोरे आणि डॉ. अतुल भोसले हेही आमदार झाले. आता मी विधानपरिषदेत निवडून आलो आहे. त्यामुळे गोरे आणि इतर नेत्यांनी दिलेला शब्द पूर्ण झाला आहे. आम्ही चौघेही आमदार झालो असून, हीच या भूमीतील नव्या राजकीय पर्वाची सुरुवात आहे, अशी भावना धैर्यशील कदम यांनी व्यक्त केली.

Related Articles