सातारा जिल्हाहोम

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा जनआक्रोश

साताऱ्यात मोर्चा काढून केंद्र सरकारवर निशाणा; पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी

कराड/प्रतिनिधी : –

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले असून, केंद्र सरकारने तातडीने इंधन दरवाढीवर नियंत्रण आणावे, या मागणीसाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चादरम्यान केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘इंधन दरवाढ कमी करा’, ‘महागाईला लगाम घाला’, ‘सामान्य जनतेला दिलासा द्या’ अशा आशयाचे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा परिणाम वाहतूक, शेती, उद्योग, तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होत असल्याने महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घरगुती अर्थकारण विस्कळीत झाले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

मोर्चादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागरिकांना मेलडी चॉकलेटचे वाटप करून केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. या उपक्रमामुळे उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत विविध पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत इंधनावरील करांमध्ये कपात करण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे शेतकरी, कामगार, वाहतूक व्यवसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे सांगितले. जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, मोर्चामुळे काही काळ शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले. या मोर्चात शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधातील नाराजी व्यक्त केली.

Related Articles