सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्याची लढाई सामान्य सभासदांच्या स्वाभिमानाची – अविनाश मोहिते

एफआरपीपेक्षा जादा ऊसदर, मोफत साखर आणि सिंचन प्रश्नांवर अर्चना मोहिते यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा 

कराड/प्रतिनिधी : –

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थापक पॅनलने रणशिंग फुंकले असून, ही निवडणूक सर्वसामान्य सभासदांच्या स्वाभिमानाची आहे, असा दावा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केला. गेल्या काही वर्षांतील कारखान्याच्या कारभारावर टीका करताना त्यांनी ऊसदर, सिंचन व्यवस्था, सभासदांशी तुटलेला संपर्क आणि शेअर्स हस्तांतरणाचा प्रश्न यावरून विद्यमान व्यवस्थापनावर निशाणा साधला.

रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थापक पॅनलच्या उमेदवार अर्चना मोहिते यांच्यासह अन्य उमेदवार, शेतकरी उपस्थित होते.

अविनाश मोहिते म्हणाले, संस्थापक पॅनलच्या सत्ताकाळात सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. सभासदांना दरमहा पाच किलो साखर दोन रुपये किलो दराने देण्याचे आश्वासन पूर्ण केले. एफआरपीपेक्षा तब्बल ३४१ कोटी रुपये अधिक ऊसदर दिला. उपसा जलसिंचन योजनांसाठी स्वतंत्र वीज फिडर उभारून शेतकऱ्यांना वेळेत पाणी देण्याची व्यवस्था केली. डिस्टिलरीचा नफा वाढवला आणि सभासदांच्या अडचणींमध्ये कारखाना थेट उभा राहिला.

२०१५ च्या निवडणुकीचा उल्लेख करताना त्यांनी निकाल प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काय झाले हे सभासदांना माहिती आहे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. मागील निवडणुकीत मतविभाजनाचा फटका बसल्याचे सांगत यावेळी सर्वसामान्य सभासदांचा मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत कोणतेही आमिष, पैशांचा वापर किंवा दबाव न आणता मुक्त आणि निपक्षपाती वातावरणात मतदान व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीपूर्वी विविध पक्षांतील राज्यस्तरीय नेत्यांच्या भेटी घेत सहकार्याची अपेक्षा व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्याचे विद्यमान चेअरमन नेमका किती वेळ कारखान्यावर उपस्थित असतात? सभासदांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी त्यांनी कितपत वेळ दिला आहे? असे सवाल उपस्थित करत माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यावर जोरदार टीका केली. ‘कृष्णा कारखाना’ हा पार्ट टाइम जॉब नसून, पूर्णवेळ जबाबदारी आहे, अशा शब्दांत त्यांनी चेअरमन डॉ. भोसले यांच्यावर निशाणा साधला. तसेच कारखान्यातील सुमारे दहा हजार मयत सभासदांचे शेअर्स अद्याप त्यांच्या वारसांच्या नावे हस्तांतरित झालेले नाहीत. शेअर ट्रान्सफर प्रक्रियेत पारदर्शकता नसून तोंडे पाहून निर्णय घेतले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, संस्थापक पॅनलच्या उमेदवार अर्चना मोहिते यांनीही विद्यमान कारभारावर जोरदार टीका केली. आज सभासदांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. ऊसतोड वेळेत होत नाही, सिंचन योजनांचे व्यवस्थापन कोलमडले आहे, अनेक शेतकऱ्यांचे ऊस पाण्याअभावी वाळत आहेत. मात्र पाणीपट्टी प्रचंड आकारली जात आहे. सुमारे दहा हजार सभासदांचे शेअर्स अद्याप वारसांच्या नावावर वर्ग करण्यात आलेले नाहीत. चार हजार कामगार सभासदांच्या प्रश्नांकडेही दुर्लक्ष झाले आहे. हा प्रकार कारखाना खासगीकरणाच्या दिशेने नेणारा आहे. संस्थापक पॅनलकडून लवकरच स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असून, त्यामध्ये सभासदांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यातील प्रमुख आश्वासनांमध्ये दरवर्षी प्रत्येक सभासदाला १२० किलो साखर विनामूल्य देणे, पाणीपट्टी टनामध्ये न आकारता पैशात आकारणे, वार्षिक पाणीपट्टी सुमारे साडेसात हजार रुपयांपर्यंत मर्यादित ठेवणे आणि उसाला एफआरपीपेक्षा जादा दर देणे यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. यापूर्वीही आश्वासने पूर्ण केली आहेत. यावेळीही सभासदांच्या विश्वासावर उतरू, असा विश्वास अर्चना मोहिते यांनी व्यक्त केला.

सभासदाला १२० किलो साखर विनामूल्य देणार

सध्याच्या कारखाना व्यवस्थापनाकडून सभासदांना दिली जाणारी साखर निकृष्ट दर्जाची असून, सभासदांच्या हक्काची साखरच ‘मोफत’ दिल्याचा गवगवा केला जात आहे. हा प्रकार सभासदांचा अपमान करणारा असल्याची टीका अर्चना मोहिते यांनी केली. सभासद हा कारखान्याचा खरा मालक असून, त्याच्या हक्काचा सन्मान राखणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत आल्यानंतर प्रत्येक सभासदाला दरवर्षी १२० किलो दर्जेदार साखर विनामूल्य देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Related Articles