सातारा जिल्हाहोम

आमदार मनोजदादांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांची कृतज्ञता

शेतातल्या भाज्यांची अनोखी भेट; हणबरवाडी-धनगरवाडी उपसा सिंचन योजनेमुळे शेतीला नवसंजीवनी 

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तरचे जननायक आमदार मनोज घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त मसूर परिसरातील शेतकऱ्यांनी कृतज्ञतेची अनोखी भावना व्यक्त करत स्वतःच्या शेतात पिकवलेला ताजा भाजीपाला भेट देऊन वाढदिवस साजरा केला. हणबरवाडी-धनगरवाडी उपसा सिंचन योजना सुरू झाल्यानंतर परिसरातील शेतीला नवसंजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांनी हा अभिनव उपक्रम राबविला.

आमदार घोरपडे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या सिंचन योजनेमुळे अनेक वर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात अखेर पाणी पोहोचले. परिणामी परिसरातील कोरडवाहू शेती आता हिरवाईने नटली असून ऊस, भाजीपाला, फळबागांसह विविध पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेती उत्पादनात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीतही सकारात्मक बदल घडू लागला आहे.

याच भावनेतून मसूर परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ताजा भाजीपाला आमदार मनोजदादा घोरपडे यांना भेट देत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पाणी मिळाल्यामुळे आमची शेती वाचली आणि कुटुंबाला आधार मिळाला, अशा भावना यावेळी अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, “शेतकरी समृद्ध झाला तरच ग्रामीण भागाचा खरा विकास होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत भविष्यातही अशा विकासकामांसाठी कटिबद्ध राहणार आहे.

या प्रसंगी पतंगअण्णा माने, लालासाहेब जगदाळे, कोमल प्रशांत यादव, दिनकर पाटील, भानुदास पोळ, बाळासाहेब जाधव, पुरंदर जाधव, मधुकर जाधव, संभाजी पवार, सतीश पवार, प्रवीण आप्पा घोलप, अभिजित पाटील, श्रीकांत पाटील, नितीराज जाधव, बापूसाहेब पवार, इंद्रजीत साळुंखे, सचिन यादव यांच्यासह मसूर परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles