रयत संघर्ष मंचचा सहकार पॅनलला पाठिंबा डॉ. इंद्रजीत मोहिते
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना राजकारणाचा अड्डा बनू नये

कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना, रयत संघर्ष मंचाने महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट करत सहकार पॅनेलला अटींसह पाठिंबा जाहीर केला आहे. कारखाना कोण्या एका व्यक्तीचा नसून, तो सभासदांच्या मालकीचा आहे. त्यामुळे कारखाना टिकला पाहिजे, सभासदांचे हित अबाधित राहिले पाहिजे आणि सहकाराचा मूलभूत विचार जपला गेला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका रयत संघर्ष मंचाचे नेते डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
कारखान्याच्या निवडणुकीत मंचाची भूमिका काय असणार, याबाबत अनेक स्तरांवर चर्चा सुरू असताना डॉ. मोहिते यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी कारखान्याच्या सध्याच्या परिस्थितीपासून सहकार चळवळीतील बदल, राजकारणाचे वाढते हस्तक्षेप आणि सभासदांच्या प्रश्नांपर्यंत अनेक मुद्यांवर परखड भाष्य केले. सहकारी साखर कारखान्यांचे स्वरूप गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलले आहे. बदलत्या आर्थिक आणि औद्योगिक परिस्थितीत कारखाना चालवणे अधिक कठीण झाले आहे. अशा काळात केवळ राजकीय संघर्षासाठी संघर्ष करणे योग्य नाही. सभासदांचे हित, कारखान्याचे अस्तित्व आणि सहकाराची परंपरा टिकवणे, हेच अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
रयत संघर्ष मंचाने गेली ३६ वर्षे सभासदांच्या हितासाठी संघर्ष केला असून, कारखाना चालवण्याची संधी मिळाल्यानंतर अनेक निर्णय सभासदांच्या फायद्यासाठी घेतले, असे सांगताना त्यांनी आत्मपरीक्षणही केले. सत्तेवर बसणारा कुणीही धुतल्या तांदळाचा नसतो. चुका प्रत्येकाकडून होतात. आमच्याकडूनही काही चुका झाल्या. मात्र त्या चुकांवरून कारखाना राजकारणाचा अड्डा बनवणे योग्य नाही, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी नमूद केले. कारखान्यातील अनेक मूलभूत प्रश्न अद्याप कायम असल्याचे सांगत त्यांनी, ९ हजार सभासदांचे शेअर ट्रान्सफर अद्याप प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधले. ही अत्यंत गंभीर आणि शोकांतिक बाब आहे. सभासदांना न्याय मिळण्यासाठी हे प्रश्न तातडीने मार्गी लागणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
निवडणुकीत संस्थापक आणि सहकार पॅनेल आमनेसामने असताना दोन्ही बाजूंच्या नेतृत्वाचा आणि क्षमतेचा अभ्यास करूनच सहकार पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. मोहिते यांनी स्पष्ट केले. सहकार पॅनेलकडे आर्थिक शिस्त, नेतृत्व क्षमता आणि कारखाना टिकवण्याची दृष्टी दिसते. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र याचा अर्थ आम्ही प्रत्यक्ष प्रचारात उतरणार आहोत, असा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच सभासदांचे हित जपले गेले नाही, कारखाना विकासाच्या दिशेने नेला गेला नाही किंवा दिलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर भविष्यात रयत संघर्ष मंच पुन्हा संघर्षाच्या भूमिकेत उतरेल, आस सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच कृषी उद्योग संघ, यशवंतराव मोहिते नागरी पतसंस्था यांसारख्या संस्थांकडे दुर्लक्ष झाल्याने त्या अडचणीत आल्याचे सांगत, या संस्था पुन्हा सक्षम करण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.
यशवंतराव मोहिते यांनी शेतकरी समृद्धीसाठी सहकाराचा मार्ग स्वीकारला. सहकार मंदिरात जाताना राजकीय पादुका बाहेर काढाव्यात, हा त्यांचा विचार होता. मात्र आज कारखान्याच्या दारातच राजकीय संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. सत्तेच्या राजकारणात शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे संघर्षाऐवजी सहकार्याचा मार्ग स्वीकारत आम्ही तात्पुरते एक पाऊल मागे घेतला असल्याचे डॉ. मोहिते यांनी सांगितले.


