सातारा जिल्हाहोम

सहकारात सहकार्याची भूमिका असावी – आमदार डॉ. अतुल भोसले

विरोधकांवर केली अप्रत्यक्ष टीका; गत निवडणुकीपेक्षाही अधिक मताधिक्याने सहकार पॅनल विजयी होईल

कराड/प्रतिनिधी : –

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकारातील राजकीय वातावरण तापू लागले असताना, आमदार डॉ. अतुल भोसले यांनी ‘सहकारात संघर्ष नव्हे; तर समन्वय’ ही भूमिका ठामपणे मांडली. सहकारी संस्थांच्या निवडणुका पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी लढल्या गेल्या पाहिजेत, असे सांगत सहकारात सहकार्याची भूमिका असावी; अटी-शर्तींवर कोणाचाही पाठिंबा घेतलेला नाही, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले.

रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कारखान्याच्या कामगिरीचा आढावा घेत विरोधकांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. डॉ. भोसले म्हणाले, राजारामबापू पाटील, यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले आदींनी सहकार चळवळीची उभारणी करताना राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून शेतकरी केंद्रस्थानी ठेवला. त्याच विचारांचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. सहकारी संस्थांमध्ये काम करताना इतर राजकीय समीकरणांचा प्रभाव व्यवस्थापनावर पडता कामा नये.

कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्याने आदर्श कामकाज केले असून, त्याचा थेट लाभ सभासद शेतकऱ्यांना झाला आहे. राज्यात सर्वाधिक ऊसदर देणाऱ्या कारखान्यांमध्ये कृष्णा कारखान्याने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सभासदांना वर्षाला ६० किलो साखर मोफत घरपोच देण्याची योजना, विविध सुविधा आणि शेतकरी हिताच्या उपक्रमांमुळे कारखान्याबद्दल सभासदांमध्ये विश्वास वाढत आहे, असे त्यांनी नमूद केले.

कारखान्याने यंदा तब्बल १४ लाख ४९ हजार टन ऊस गाळप करून राज्यात दुसऱ्या क्रमांकाची झेप घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी व्यवस्थापनाच्या कामगिरीचे कौतुक केले. चांगले काम करणाऱ्या संस्थेला सभासदांचा प्रतिसाद मिळतोच. त्यामुळे गत निवडणुकीपेक्षाही अधिक मताधिक्याने सहकार पॅनल विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांच्या भूमिकेवर भाष्य करताना डॉ. भोसले म्हणाले, निवडणूक कोणतीही असो, ती गांभीर्याने घ्यावी लागते. विरोधात कोण आहे हे महत्त्वाचे नसते; काम किती केले हे महत्त्वाचे असते. गेल्या ११ वर्षांत विरोधकांनी सभासद शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत किती वेळा आवाज उठवला, हे सर्वांना माहिती आहे. केवळ आरोप करून परिस्थिती बदलत नाही.

सहकार पॅनलला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, कारखाना कार्यक्षेत्रातील पाचही तालुक्यांतील नेत्यांशी संवाद साधला आहे. आम्ही सर्वांकडे सहकार्याची भूमिका घेऊन गेलो. सभासद शेतकऱ्यांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असून, लवकरच सभासदांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

माजी मंत्री जयंतराव पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या भेटीबाबत विचारले असता, तेही सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे नेते आहेत. कार्यक्षेत्रातील सर्व नेत्यांशी संवाद साधणे ही आमची भूमिका आहे. सहकारात संघर्षापेक्षा सहकार्याचा मार्ग अधिक महत्त्वाचा आहे असे ते म्हणाले.

विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पक्षीय समीकरणांना महत्त्व असते. मात्र सहकारी संस्थांच्या निवडणुका वेगळ्या स्वरूपाच्या असतात. येथे समन्वय आणि विकासाची भूमिका अधिक महत्त्वाची असते. सहकारात एकत्र येण्याची काहींची इच्छा असेल, तर त्याचे स्वागतच पाहिजे, असे सांगत डॉ. अतुल भोसले यांनी उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या संभाव्य पाठिंब्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली. ते म्हणाले, रयत सहकारी साखर कारखान्यालाही वेळोवेळी आम्ही मदत केली आहे. त्यामुळे सहकार चळवळीमध्ये परस्पर सहकार्याची भावना कायम राहिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

सहकारातील राजकारण हे अटी-शर्तींवर चालणारे नसावे. जास्तीत जास्त लोकांना सोबत घेऊन शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्याची गरज आहे. आम्ही कोणाचाही पाठिंबा अटी-शर्तींवर घेतलेला नाही, असे स्पष्ट करत डॉ. भोसले यांनी, समन्वयाच्या राजकारणावर भर दिला. गेल्या निवडणुकांमध्ये विविध गट आणि समीकरणे वेगवेगळी होती. मात्र आता सहकार क्षेत्रात राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन इंद्रजीत मोहिते यांच्या भूमिकेबाबत विचारले असता डॉ. भोसले म्हणाले, इंद्रजीत मोहिते हे सहकार क्षेत्रातील मोठे नेते आहेत. त्यांनी आमच्यासोबत येण्याची भूमिका घेतली, तर त्याचे आम्ही स्वागतच करू. त्यांच्या अनुभवाचा आणि पाठिंब्याचा निश्चितच फायदा होईल.

 

 

Related Articles