सातारा जिल्हाहोम

दादासाहेब मोकाशी महाविद्यालय अधिकारी बनवण्याचा कारखाना – आ. मनोज घोरपडे

दादासाहेब मोकाशी अमृतमहोत्सवी जयंती सोहळा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
दादासाहेब मोकाशी यांनी उभारलेल्या कृषी महाविद्यालयात आज 19 प्रकारच्या विविध कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. एक जबाबदार नागरिक व भावी पिढी घडवण्याचे काम दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामार्फत होत असून हे महाविद्यालय अधिकारी निर्माण करण्याचा कारखानाच असल्याचे सांगत या महाविद्यालयास आपण केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून लागेल ती मदत करू, अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.
राजमाची (ता. कराड) येथे शिक्षणमहर्षी दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलात मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे संस्थापक दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांच्या 75 व्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी, सचिव अभिजीत मोकाशी, भाजपचे प्रदेश सचिव भरत पाटील, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब कदम, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, निवृत्ती पोलीस अधिकारी डी. बी. पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस, उद्योगपती राजेंद्र शेलार, रयत क्रांतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन नलवडे, महाविद्यालयाचे संचालक विलास चौधरी, प्राचार्य ए. एस. ढाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार श्री. घोरपडे म्हणाले, दादासाहेब मोकाशी यांनी कृषी क्षेत्रावरील निष्ठेतून त्यांनी कृषी महाविद्यालयाचे रोपटे लावले. या महाविद्यालयातील विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून नावलौकिक मिळतील. दादासाहेब मोकाशी यांना कुस्ती क्षेत्रातही फार आवड होती. त्यांनी अनेक स्पर्धांचे आयोजन करून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
राजेंद्र शेलार म्हणाले, केवळ कृषी महाविद्यालय उभे करण्याइतपत दादासाहेब मोकाशी यांचे कर्तृत्व मर्यादित नाही. तर मुंबईत इंजिनिअरिंग कॉलेजचे जाळे विणले गेले; त्यावेळी पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेजची निर्मिती झाली. यामध्ये दादासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी कराडला कृषी महाविद्यालय सुरू केले. बारामती कृषी विद्यापीठानंतर महाराष्ट्रात मोकाशी कॉलेजची गणना होते. आज दादासाहेबांचे अपूर्ण स्वप्न त्यांच्या पश्चात त्यांची दोन्ही मुले पूर्ण करत असून वडिलांचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून करत आहेत.
सचिन नलावडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दादासाहेब मोकाशी यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले.
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या 2025 सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयात आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेस मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, तसेच स्पर्धेसाठी बाहेरून आलेल्या शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles