टिळक हायस्कूलमध्ये एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
माध्यमिक शिक्षकांना संवेदीकरण व किशोरवयीन जीवनकौशल्यांबाबत मार्गदर्शन

कराड/प्रतिनिधी : –
जिल्हा एड्स नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय व सातारा, शिक्षण विभाग पंचायत समिती, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने कराड तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांसाठी एड्स रोगाविषयी संवेदीकरण व किशोरवयीन जीवनकौशल्ये कार्यशाळा टिळक हायस्कूलमध्ये पार पडली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा एड्स नियंत्रण पथकाचे अधिकारी हेमंत भोसले, पर्यवेक्षक पुंडलिक पाटील, कराड उपजिल्हा रुग्णालयातील समुपदेशक महेश शिंदे उपस्थित होते. पंचायत समिती कराड शिक्षण विभागातर्फे शीला भिसे, प्रशिक्षणार्थी म्हणून तालुक्यातील पंधरा माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.
एड्स रोगाबद्दल माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी, त्यांच्यात उद्बोधन करण्यासाठी हेमंत भोसले यांनी सचित्र संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून एड्स रोग उद्भवाची कारणे, प्रतिबंधासाठी उपाययोजना, माध्यमिक शिक्षकांनी त्यासाठी शाळा स्तरावर राबवण्याचे कार्यक्रम व उपक्रम, जनजागृतीसाठी समाज व पालकांचा सहभाग, जिल्हा एड्स नियंत्रण पथकाची एड्स प्रतिबंधासाठी मध्यवर्ती भूमिका आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
महेश शिंदे यांनी माध्यमिक शिक्षकांची एड्स रोग प्रतिबंधासाठी मार्गदर्शन व किशोरवयीन जीवनकौशल्ये विकासनासाठी माध्यमिक शिक्षकांची समुपदेशक म्हणून भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करून कार्यशाळेची सांगता झाली. कार्यशाळेचे योग्य नियोजन टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक गोकूळ अहिरे, उपमुख्याध्यापक किसन वाघमारे, पर्यवेक्षक शरद शिंदे, हायस्कूलमधील विज्ञान शिक्षक जीवन थोरात यांनी केले.