सातारा जिल्हाहोम

मराठा नव उद्योजकंच्या पाठीशी उभे राहायला हवे – नरेंद्र पाटील

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या उद्योजकांचा मेळावा उत्साहात

कराड/प्रतिनिधी –

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आजपर्यंत एक लाख लाभार्थ्यांना कर्ज पुरवठ्याचा लाभ मिळाला आहे. कर्ज घेऊन यशस्वी झालेल्या उद्योजकांच्या यशामध्ये बँकांचाही मोलाचा वाटा आहे. भविष्यातही मराठा समाजाचे जास्तीत जास्त उद्योजक निर्माण करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असून नव्याने व्यवसाय करणाऱ्या मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यात केले.

येथील कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख मराठा उद्योजकांना आर्थिक पाठबळ दिल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ व उद्योजकांच्या मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात ना. नरेंद्र पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम होते. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. ए. दिलीप गुरव, वसंतराव चव्हाण, राजेश पवार, नामदेव थोरात, रोहित पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. पाटील म्हणाले, महामंडळाच्या माध्यमातून एक लाख लोकांनी व्यवसाय करून इतरांना रोजगार निर्मिती करून दिली आहे. त्याच पद्धतीने यापुढेही मराठा युवकांनी पुढे येऊन व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. बँकांचे घेतलेले कर्ज थकीत न ठेवता त्याची वेळेवर परतफेड केली पाहिजे.

डॉ. सुभाष एरम यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आणखी उद्योजक निर्माण होतील. कराड अर्बन बँकेनेही उद्योजक उभे केले असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सी. ए. दिलीप गुरव, रोहित पाटील, भगवानराव जाधव, आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उदय थोरात यांनी केले. स्वागत वाचन विकास पाटील यांनी केले. तर हणमंतराव पाटील यांनी आभार मानले.

Related Articles