महाराष्ट्रात 1 ते 15 ऑगस्टदरम्यान महसूल पंधरवडा होणार साजरा – प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे
कराड/प्रतिनिधी –
महसूल दिनापासून दि. 1 ते 15 ऑगस्टदरम्यान महसूल पंधरवडा 2024 साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तहसीलदार विजय पवार उपस्थित होते.
प्रांताधिकारी म्हेत्रे म्हणाले, 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनातर्फे महसूल दिन साजरा करण्यात येतो. त्यानुसार 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान महसूल विभागामार्फत राज्यभरामध्ये महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार कराडमध्ये दि. 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शुभारंभ – जिल्हा व महिला बालकल्याण विकास अधिकारी व्ही. ए. तावरे यांच्या हस्ते, दि. 2 रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा – कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील पवार, दि. 3 रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन – समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे आणि जिल्हा व महिला बालविकास अधिकारी अधिकारी व्ही. ए. तावरे, दि. 4 रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय – जिल्हा प्रशासन अधिकारी अजिंक्य पाटील, दि. 5 रोजी कृषी मार्गदर्शन कार्यक्रम – जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, शेती, पाऊस व दाखले – तहसीलदार (सर्वसाधारण) चंद्रशेखर शितोळे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, दि. 7 रोजी रोजी युवा संवाद – जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख, दि. 8 रोजी महसूल जनसंवाद – जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, दि. 9 रोजी महसूल इ-प्रणाली – उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, दि. 10 रोजी सैनिक हो तुमच्यासाठी – जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ए. एस. पाथरकर, दि. 11 रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, दि. 12 रोजी एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा – समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, दि. 13 रोजी महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण – तहसीलदार (महसूल) शशिकांत जाधव, दि. 14 रोजी महसूल पंधरवडा वार्तालाप प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार विजय पवार यांच्या उपस्थितीत, तसेच दि. 15 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद, तसेच उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
51 हजार 239 दाखल्यांचे वितरण
सध्या शालेय, महाविद्यालय शैक्षणिक प्रक्रिया, तसेच शासनाच्या विविध योजनांसाठी आवश्यक असणाऱ्या दाखल्यांचे दाखले वितरण करण्याची प्रक्रिया तहसीलदार, तसेच प्रांत कार्यालयात सुरू आहे. त्यानुसार आजअखेर प्रांत कार्यालयाच्या वतीने 7 हजार 846 दाखले, तर तहसील कार्यालयामार्फत तब्बल 43 हजार 393 दाखले वितरित करण्यात आले असून एकूण 51 हजार 239 दाखल्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी यावेळी दिली.