सातारा जिल्हाहोम

वैद्यकीय क्षेत्र व कायदा यांचा समन्वय काळाची गरज – न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे

कृष्णा विश्व विद्यापीठात जाहीर व्याख्यान; जिल्ह्यातील मान्यवर वकिलांची उपस्थिती

कराड/प्रतिनिधी : – 

वैद्यकीय क्षेत्र आणि कायदा ही स्वतंत्र क्षेत्रे असली, तरी दोन्हींच्या केंद्रस्थानी मानवी जीवन, हक्क, प्रतिष्ठा आणि न्याय असल्याने या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रभावी समन्वय आवश्यक आहे. भविष्यातील वैद्यकीय आणि कायदेविषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी डॉक्टर, वकील आणि कायद्याचे विद्यार्थी यांनी परस्परांच्या क्षेत्राची समज विकसित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती सौ. रेवती मोहिते-डेरे यांनी केले.

कृष्णा विश्व विद्यापीठाच्यावतीने आयोजित ‘वैद्यकीय क्षेत्र आणि कायदा यांच्यातील परस्परसंबंध’ या विषयावरील जाहीर व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, माजी राज्यसभा सदस्य ॲड. वंदनाताई चव्हाण, प्रसिद्ध लेखिका विनिता कामटे, ॲड. संभाजीराव मोहिते, श्री. विनायक भोसले, डॉ. प्रवीण शिणगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

न्यायमूर्ती सौ. रेवती मोहिते-डेरे म्हणाल्या की, रुग्ण रुग्णालयात येतो तेव्हा तो केवळ उपचारासाठी येत नाही, तर आपले जीवन, आरोग्य, प्रतिष्ठा आणि विश्वास डॉक्टरांच्या हाती सोपवतो. त्यामुळे माहितीपूर्ण संमती, वैद्यकीय नोंदी, रुग्णाची गोपनीयता यांसारख्या विषयांना वैद्यकीय क्षेत्रासोबतच कायदेशीर दृष्टिकोनातूनही समजून घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांसमोर निर्णय घेण्याचे मोठे आव्हान असते; मात्र अशा परिस्थितीतही रुग्णाची स्वायत्तता आणि प्रतिष्ठा जपणे महत्त्वाचे असते.

वैद्यकीय नोंदींचे महत्त्व अधोरेखित करताना त्या म्हणाल्या की, अनेक वर्षांनंतरही डॉक्टरांनी केलेली नोंद महत्त्वाचा पुरावा ठरते. त्यामुळे उपचारादरम्यान काय माहिती होती, कोणते निर्णय घेतले, कोणते उपचार केले आणि ते का केले, याची अचूक नोंद करणे आवश्यक आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्र आणि कायदा यांच्यात संघर्षाऐवजी सहकार्याची भूमिका असावी. डॉक्टर आणि वकील यांनी एकमेकांच्या क्षेत्रातील वास्तव समजून घेतल्यास अधिक परिणामकारक न्यायव्यवस्था आणि सुरक्षित आरोग्यव्यवस्था निर्माण होऊ शकते. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया किंवा डिजिटल माध्यमांवर रुग्णाची ओळख उघड होणार नाही, याची डॉक्टरांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश भोसले म्हणाले, डॉक्टरांनी कायद्याची जाण ठेवण्याबरोबरच रुग्णांशी संवाद साधणे, स्वतःची ओळख करून देणे आणि उपचाराबाबत रुग्णाला योग्य माहिती देणे आवश्यक आहे. रुग्णालयाच्या यशामध्ये डॉक्टरांसोबत परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर सहकाऱ्यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी न्यायमूर्ती सौ. रेवती मोहिते-डेरे यांच्या शैक्षणिक व न्यायिक कारकिर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख करत, न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ असून, न्यायव्यवस्था सक्षम राहणे ही सुदृढ लोकशाहीसाठी आवश्यक बाब असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश ॲड. एस. सी. शिंदे, ॲड. ए. ए. चेंडके, ॲड. हेमंत चव्हाण, राहुल कामटे, कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, कृष्णा विद्यापीठाच्या संशोधन संचालक (नि. ब्रिगेडियर) डॉ. हिमाश्री, डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा वैद्यकीय विज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डॉ. युगंतरा कदम, फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे, फार्मसी विभागाचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव आदींसह कराड व सातारा बार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, तसेच वैद्यकीय व विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.

‘कृष्णा’च्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक 

मेघालयच्या मुख्य न्यायमूर्ती सौ. रेवती मोहिते-डेरे यांनी कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कार्याचा गौरव करताना विद्यापीठाच्या वैद्यकीय शिक्षण, आरोग्यसेवा, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य आरोग्य व विज्ञान विद्यापीठ म्हणून त्यांनी कृष्णा विश्व विद्यापीठाचा उल्लेख करत; डॉक्टर, संशोधक आणि जैवनीतितज्ज्ञ यांना एकत्र आणणारी ही संस्था देशातील वैशिष्ट्यपूर्ण विद्यापीठांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कृष्णा विद्यापीठाचे मॉडेल देशातील इतर शिक्षण व आरोग्य संस्थांनीही स्वीकारावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles