सहकाराच्या ताकदीवर उभारलेल्या सिंचन योजनांना बळ द्या – बाळासाहेब पाटील
‘श्री ज्योतिर्लिंग’ची सभा उत्साहात; थकित पाणीपट्टी भरण्याचे सभासदांना आवाहन

कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून परिसरात लिफ्ट इरिगेशन योजनांचे जाळे उभारून हजारो एकर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आले. आदरणीय पी. डी. पाटील यांनी जिरायत शेती बागायत करण्याची भूमिका घेऊन सिंचन सुविधा निर्माण केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडले. सहकाराच्या या मातृसंस्थेला न विसरूता सहकाराच्या ताकदीवर उभारलेल्या सिंचन योजनांना बळ द्या, असे आवाहन माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
चरेगाव, ता. कराड येथील श्री ज्योतिर्लिंग सहकारी पाणीपुरवठा संस्थेची वार्षिक सभा चेअरमन मिलिंद बाबुराव माने यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पाटील म्हणाले, संस्थेने झीज फंडाची स्वतंत्र तरतूद केली असून, सभासदांनी थकित पाणीपट्टी वेळेत भरावी. कारखान्याचे विस्तारीकरण पूर्ण झाले असून, आगामी हंगामात प्रतिदिन ११ हजार टनांपेक्षा अधिक गाळपासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाणीपुरवठा संस्थांच्या वीजदरासाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने संघर्ष केला असून, वाढलेल्या शासकीय पाणीपट्टीच्या दरासाठीही लढा द्यावा लागणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
व्हाईस चेअरमन संभाजीराव माने यांनी, योजनेची यंत्रसामग्री जुनी झाल्याने देखभाल-दुरुस्ती व लिकेजवर मोठा खर्च होत असल्याचे सांगून सभासदांनी पाणीपट्टी वेळेत भरावी, असे आवाहन केले. सचिव पोपट बाकले यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सभासदांच्या प्रश्नांना क्लार्क शिवाजी माने यांनी उत्तरे दिली. प्रारंभी स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. पी. डी. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविक पुजारी यांनी केले, तर आभार संजय माने यांनी मानले. सभेस सह्याद्रि कारखान्याचे संचालक सुरेशराव माने, जयंत जाधव, माजी संचालक पै. संजय थोरात, व्हाईस चेअरमन संभाजी पवार, कारखान्याचे जनरल मॅनेजर (केन) सुजय पवार, इरिगेशन इंजिनिअर संजय क्षीरसागर, आर. जी. तांबे यांच्यासह संस्थेचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



