सातारा जिल्हाहोम

कृष्णा कृषी महाविद्यालयात प्रथम वर्ष बी.एससी. ॲग्री प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद; पुष्पगुच्छ देऊन नवोदितांचे स्वागत

कराड/प्रतिनिधी: – 

येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालयात शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्ष कृषि पदवी प्रवेश प्रक्रियेची अत्यंत उत्साही वातावरणात सुरुवात करण्यात आली. प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीलाच महाविद्यालयाच्या प्रांगणात नवोदित विद्यार्थी आणि पालकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांच्या हस्ते आणि वरिष्ठ प्राध्यापकांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या प्रसंगी प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आपुलकीने स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. अशोक फरांदे म्हणाले की, “कृषि क्षेत्र हा देशाचा कणा असून यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व नवनिर्मितीला मोठा वाव आहे. जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी केवळ पदवीधारक न राहता एक सक्षम कृषि उद्योजक व शास्त्रज्ञ बनेल, असा आमचा प्रयत्न राहील. शिक्षणाच्या गुणवत्तेशी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.”

विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी महाविद्यालयात सुसज्ज ‘मदत कक्ष’ स्थापन करण्यात आला असून, कागदपत्रे व शुल्क रचनेबाबत मार्गदर्शन केले जात आहे. या कार्यक्रमास डॉ. सारंग कुंभार, नोडल ऑफिसर प्रा. शंकर बाबर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रवेश समितीचे सदस्य, कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles