सातारा जिल्हाहोम

ग्रामस्थांच्या हृद्य सत्काराने भारावल्या रेठरे बुद्रुकच्या तीन कर्तृत्ववान भगिनी

माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि वीरपत्नी विनिता कामटे यांचा ग्रामस्थांकडून गौरव

कराड/प्रतिनिधी : –

राजकीय क्षेत्रात, न्यायव्यवस्थेत आणि साहित्य क्षेत्रात आपल्या अतुलनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या रेठरे बुद्रुकच्या तीन कर्तृत्ववान भगिनींचा आज ग्रामस्थांनी भव्य नागरी सत्कार केला. या हृद्य सत्काराने रेठरे बुद्रुकच्या कर्तृत्ववान माहेरवाशिणी माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती सौ. रेवती मोहिते-डेरे आणि सुप्रसिद्ध लेखिका वीरपत्नी विनिता अशोक कामटे या तिघी बहिणी भारावून गेल्या.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते तसेच आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भावपूर्ण सोहळा पार पडला. फेटा, शाल, श्रीफळ, मानपत्र, रेठरे बासमती तांदूळ, रेठरा पेढा आणि रेठरा तूप देऊन तिन्ही भगिनींचा गौरव करण्यात आला.

माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या कृष्णाघाटाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त व कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित कार्यक्रमानिमित्त ॲड. चव्हाण यांच्यासह त्यांच्या भगिनी रेवती मोहिते-डेरे आणि विनिता कामटे आज कराड येथे आल्या होत्या. यानिमित्ताने रेठरे बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

या सत्काराला उत्तर देताना बालपणींच्या आठवणींना उजाळा देत ॲड. वंदनाताई चव्हाण म्हणाल्या, आमच्या मूळ गावात होत असलेला हा सत्कार आमच्यासाठी खूप विशेष आहे. रेठरे बुद्रुकला मोठी नैसर्गिक समृद्धी लाभली आहे. अनेक थोर व्यक्ती या गावाला लाभल्या आणि त्यांनी गावाची ओळख देशभर निर्माण केली. आम्ही तिघी बहिणी अनेक वर्षांनी एकत्र गावी आलो. आज गावकऱ्यांनी दिलेला प्रेमाचा ओलावा अनुभवला. त्यामुळे आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. यापुढे वारंवार गावाला यावे लागेल. आम्ही पुण्यात वाढलो, तरी आम्ही रेठरे बुद्रुकच्या आहोत, हे अभिमानाने सांगतो.

आजचा सत्कार हा केवळ आम्हा तिघींचा सत्कार नाही. तर ज्या पालकांनी आपल्या मुलींना स्वप्ने पाहायला शिकवले आणि ती स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी बळ दिले, त्या सर्व पालकांचा हा सत्कार आहे. आमच्या वडिलांनी दिलेल्या संस्कारामुळे व शिक्षणामुळेच आम्ही या उंचीवर पोहचू शकलो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या घरातील मुलींना आणि महिलांना पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या भाषणात या तिन्ही कर्तृत्वान भगिनींच्या कार्याचा विशेष गौरव करत, त्या रेठरे बुद्रुकच्या आहेत ही गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा सत्कार आयोजित घेण्यात आला आहे. मुली शिक्षणात पुढे जात असून, नवीन पिढीला अधिकाधिक संधी देण्याची गरज आहे. कृष्णा समूहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत असून, महिलांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, रेठरे बुद्रुकला प्रगत गाव करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्या गावाचा आणि मतदारसंघाचा देशात आदर्श निर्माण करणे, हा आमचा संकल्प आहे.

डॉ. इंद्रजित मोहिते यांनी तिन्ही बहिणींच्या कर्तृत्वाचा उल्लेख करताना, राजकारण, न्यायव्यवस्था, लेखन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटविला असून, चांगले संस्कार आणि उत्तम शिक्षणामुळे हे शक्य झाल्याचे सांगितले.

सरपंच हणमंत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी मानपत्राचे वाचन केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. जि. प. सदस्य सौ. प्रियांका साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ॲड. हेमंत चव्हाण, राहुल कामटे, जि. प. सदस्य शैलजा शिंदे, पं. स. सभापती नंदाताई यादव, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, कराडचे नगरसेवक शिवाजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सांगली महिला जिल्हाध्यक्ष सौ. सुश्मिता जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लहानपणीच्या आठवणींना उजाळा

रेठरे बुद्रुकमधील लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण म्हणाल्या, लहानपणी आम्ही चुलत भावंडांसोबत शेतात जायचो. शेजाऱ्यांकडे पोहे खायचो. आमचे वडील आम्हाला मंदिर आणि नदीजवळ घेऊन यायचे. आम्ही या निसर्गाचा आनंद लुटायचो. आमचे वडील या नदीत पोहले आहेत. ज्या नदीचा आम्ही लहानपणी आनंद घेतला, त्याच नदीवर घाट बांधण्याचे भाग्य मला लाभले, याचा विशेष अभिमान आहे.

Related Articles