सातारा जिल्हाहोम

‘मलकापूर रोडरेस २०२६’ उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

आदर्श क्रीडा संस्था, कराड व श्री मळाईदेवी नागरी सह. पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मलकापूर परिसरात ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने भावी धावपटू घडवण्यासाठी ‘मलकापूर रोड रेस २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले. शनिवारी (दि. २२) सकाळी ८ ते ११ या वेळेत ५ वर्ष वयोगट ते १४ वर्ष वयोगटांतील मुला-मुलींच्या धावण्याच्या शर्यती अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडल्या.

स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिलीप चिंचकर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष वसंतराव चव्हाण, मार्गदर्शक संचालिका व नगरसेविका मलकापूर डॉ. स्वाती थोरात, हणमंतराव पवार, विद्यालयाचे प्राचार्य मारुती फराळे, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे प्रमुख उपस्थित होते.

प्रास्ताविकात मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांनी, संस्थेच्या क्रीडाविषयक उपक्रमांची माहिती उपस्थित खेळाडू व पालकांना दिली.

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिलीप चिंचकर यांनी, चिमुकल्यांच्या क्रीडा कौशल्याला आणि जिद्दीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी अशी आयोजन गेली अनेक वर्ष श्री मळाईदेवी शिक्षण संस्था सातत्याने संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या अचूक मार्गदर्शनानुसार करीत आहे. त्यामुळे चांगले व दर्जेदार खेळाडू आज राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. त्यासाठी सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आपल्याला नेहमीच स्पर्धेच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करीत राहील, असे मत व्यक्त केले.

डॉ. स्वाती थोरात यांनी, धावण्याची स्पर्धा ही केवळ पायांची शर्यत नसते, ती तुमच्या इच्छाशक्तीची, जिद्दीची आणि शिस्तीची परीक्षा असल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री मळाईदेवी पतसंस्थेचे अजित थोरात, कार्यक्रमाचे अध्यक्ष अलसाकिब युनूस पटेल आणि इरफान मोमीन, संस्थेचे उपाध्यक्ष वसंतराव चव्हाण, डॉ. स्वाती थोरात यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेत विविध वयोगटांनुसार मुले व मुलींच्या गटात अव्वल ५ ठरलेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत; ५ वर्षे वयोगट (मुले) आद्विक सचिन पवार (आदर्श शिशु आगाशिवनगर), मुली – शिवश्री सचिन पाटील (आदर्श शिशु मलकापूर), ६ वर्षे वयोगट (मुले) – प्रिन्स प्रसाद खराडे (आदर्श शिशु मलकापूर), मुली – ईश्वरी रविंद्र देशमुख (आदर्श आगाशिवनगर), ८ वर्षे वयोगट (मुले) – विघ्नेश गणेश कवर (आ. प्रा. वि. मलकापूर), मुली – आरोही पंकज पाटील (आ. प्रा. वि. आगाशिवनगर), १० वर्षे वयोगट – (मुले) – आदर्श शशिकांत येडगे (आ. प्रा. वि. मलकापूर), मुली – अर्पिता कृष्णत निलगुंडे (स्टार इ. मि. स्कुल मलकापूर), १२ वर्षे वयोगट (मुले) – सार्थक तानाजी माने (आ. प्रा. वि. आगाशिवनगर), मुली – आराध्या अनिल गरुड (आ. च. वि. पोतले), १४ वर्षे वयोगट – (मुले) – आर्यन संदिप माने (आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर), मुली – आसावरी निलेश पाटील (आ. च. वि. पोतले) यांचा समावेश आहे.

क्रीडाशिक्षिका श्रीमती हसिनाबेगम मुल्ला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार क्रीडाशिक्षक योगेश खराडे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आदर्श क्रीडा संस्थेचे जे.बी. पाटील (उपाध्यक्ष), जे. एन. कराळे (सचिव) आणि आदर्श क्रीडा संस्था सर्व संचालक मंडळ व राजेंद्र पांढरपट्टे, मारुती चाळके, सर्व क्रीडा शिक्षक, अमृत शिर्के, शुभम चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles