सातारा जिल्हाहोम

सैदापूरमध्ये ३२५ फूट तिरंग्याने भारावले हजारो विद्यार्थी

‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने परिसर दुमदुमला

कराड/प्रतिनिधी : –

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने सैदापूर येथे शुक्रवारी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. तब्बल ३२५ फूट लांबीचा तिरंगा हातात घेऊन हजारो विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज येथून सकाळी नऊ वाजता रॅलीला प्रारंभ झाला. कृष्णा कॅनॉल, जोतिबा मंदिर, यू-टर्न, एसजीएम कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज, बनवडी फाटा मार्गे रॅली पुन्हा एसजीएम कॉलेजच्या प्रांगणात पोहोचली. तेथे ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, वायसी कॉलेज, वेणूताई चव्हाण कॉलेज, विद्याश्री अकॅडमी, रॉयल अकॅडमी, रयत इंग्लिश मीडियम स्कूल, पावकेश्वर विद्यालय तसेच सैदापूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ग्रामस्थांनीही रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमास जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा तेजस्विनीताई घोरपडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम बाबा पावसकर, पंचायत समिती सभापती नंदाताई यादव, उपसभापती अनिताताई वेताळ, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती सदस्य माधवीताई पाटसुपे, प्रियांका पळसे, धैर्यजाताई माने, कोमलताई यादव आदी उपस्थित होते.

यावेळी सीमाताई घार्गे, प्रतिभाताई कांबळे, राजश्री पवार, सरपंच फत्तेसिंग जाधव, उपसरपंच अनिल जाधव, तुकाराम नलवडे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीचे नियोजन सरपंच फत्तेसिंग जाधव, पंचायत समिती सदस्य माधवीताई पाटसुपे, कोपर्डे मंडल अध्यक्ष तुकाराम नलवडे, हर्षद देसाई, नाना पाटसुपे व अनिल जाधव यांनी केले. ३२५ फूट तिरंग्याच्या उपस्थितीने सैदापूरमध्ये निर्माण झालेल्या देशभक्तीच्या वातावरणाने ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले.

Related Articles