रहिमतपूरच्या रस्त्यांवर ३५० फुटांचा विशाल तिरंगा
हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी शहर दुमदुमले

कराड/प्रतिनिधी : –
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ अभियानाला रहिमतपूर शहरात शुक्रवारी (दि. १४) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शालेय विद्यार्थ्यांसह हजारो नागरिकांच्या सहभागातून शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. तब्बल ३५० फुटांचा विशाल तिरंगा हे या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले.
रहिमतपूर नगरपालिकेपासून रॅलीला प्रारंभ झाला. चौंडेश्वरी मंदिर मार्गे रॅली मुख्य चौकात पोहोचली. हातात तिरंगे घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहर भारावून गेले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

रॅलीमध्ये आमदार मनोज घोरपडे, प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार संगमेश कोंडे, मुख्याधिकारी प्रशांत भोसले, रहिमतपूरच्या प्रथम नागरिक वैशाली माने, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने-कदम, राष्ट्रवादीचे नेते सचिन बेलागडे, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर सहभागी झाले होते.
ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, खेळाडू, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनीही मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग नोंदविला. त्यामुळे रॅलीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी आमदार मनोज घोरपडे म्हणाले, हर घर तिरंगा, हर मन तिरंगा या अभियानाला रहिमतपूरमध्ये युवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विविध जाती-धर्मांतील नागरिकांनी एकत्र येत ‘देश प्रथम, राष्ट्र प्रथम’ ही भावना दृढ करण्याचा संदेश या तिरंगा यात्रेतून दिला आहे.
रहिमतपूर ही स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे. देश आणि राज्याला दिशा देणारा आदर्श निर्माण करण्याची परंपरा या भूमीला लाभली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने युवकांसह सर्व नागरिक एकत्र येऊन राष्ट्रीय उत्सव साजरा करीत आहेत, असे सांगत त्यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
रॅलीच्या निमित्ताने शहरातील विविध भागांत देशभक्तीचा उत्साह दिसून आला. विद्यार्थी, शिक्षक, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि देशप्रेमाचा संदेश दिला.
यावेळी रणजित माने, निलेश माने, सतीश भोसले, तुषार चव्हाण, सनी माने, नंदकुमार माने, विक्रम माने, जयंत भोसले, सर नानासो राऊत, विलास तुपे, लालासाहेब जगदाळे, रणजित जाधव, संतोष पाटील, प्रमोद गायकवाड यांच्यासह रहिमतपूरमधील मान्यवर, विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


