कराड आगाराच्या नवीन एसटी बसेसचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते लोकार्पण
२० नवीन बसेसची मागणी, लवकरच आणखी पाच गाड्या मिळणार

कराड/प्रतिनिधी : –
कराड शहर व तालुक्यातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांची एसटी सेवेअभावी होणारी गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने कराड आगाराला महाराष्ट्र शासनाकडून पहिल्या टप्प्यात पाच नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. या नवीन बसेसचे लोकार्पण आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि अत्यंत वर्दळीचे बस स्थानक असून, दररोज सुमारे २५ ते ३० हजार प्रवासी येथून प्रवास करतात. तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने कराड हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना सक्षम एसटी सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर कराड आगाराची बस संख्या वाढविण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
सध्या कराड आगाराकडे ८९ बसेस उपलब्ध असून, आणखी २० नवीन बसेसची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे याबाबत मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नवीन बसेस उपलब्ध करून देण्याबाबत परिवहन विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच बसेस मिळाल्या असून, लवकरच आणखी पाच बसेस कराड आगाराला मिळणार आहेत. उर्वरित दहा बसेसही लवकरात लवकर मिळाव्यात, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.
नवीन बसेस अत्याधुनिक व प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्यामधील बैठक व्यवस्था दर्जेदार आहे. जास्तीत जास्त नागरिकांना सुरक्षित व नियमित एसटी सेवा मिळावी, हा शासनाचा उद्देश असल्याचे सांगत डॉ. भोसले यांनी नवीन बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.
यावेळी आगारप्रमुख शर्मिष्ठा पोळ यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, चालक व वाहक उपस्थित होते.
आगाराला मागणी केलेल्या सर्व २० नवीन बसेस उपलब्ध झाल्यानंतर कराड आगाराच्या ताफ्यात एकूण १०९ बसेस होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांची, तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांची होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होईल. काही मार्गांवर बस थांबत नसल्याच्या तक्रारीही दूर करता येतील, असा विश्वास आमदार डॉ. भोसले यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांनी राबविलेल्या ‘गाव तिथे एसटी’ या उपक्रमाचा संदर्भ देत आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला एसटी सेवेच्या माध्यमातून जोडण्याचे धोरण भाऊंनी राबविले. आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याच धोरणानुसार काम करण्याची संधी मिळत असल्याचे समाधान आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक चांगली एसटी सेवा देण्यासाठी भविष्यातही प्रयत्न सुरू राहतील.



