सातारा जिल्हाहोम

‘सी.एम. श्री’ योजनेत कराड तालुक्यातील शाळांचा समावेश होणार

आ.डॉ. अतुल भोसले यांच्या मागणीला यश; ना. पंकज भोयर यांची ग्वाही

कराड/प्रतिनिधी : –

राज्यातील शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘सी.एम. श्री’ योजनेत कराड तालुक्यातील शाळांचा प्राधान्याने समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत, कराड तालुक्याचा प्राधान्याने विचार करण्याची जोरदार मागणी केली होती.

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने देशभरात ‘पी.एम. श्री’ शाळा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही राज्य सरकारने ‘सी.एम. श्री’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, राज्यातील शासकीय शाळांना आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे.

याच पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पी.एम. श्री’ शाळा सुरू करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात ‘सी.एम. श्री’ शाळा उभारण्याची योजना पुढे येत आहे. या योजनेत कराड तालुक्यातील शाळांचा प्राधान्याने समावेश करावा.

यावर उत्तर देताना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, ‘पी.एम. श्री’ योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने देशातील निवडक शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्याचे काम केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘सी.एम. श्री’ शाळा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी राज्यातील सुमारे ४,८०० शासकीय शाळांची निवड करण्यात आली असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर राज्यभरात ‘सी.एम. श्री’ शाळांच्या विकासाला तातडीने सुरुवात केली जाईल.

आ. डॉ. भोसले यांनी, कराड दक्षिण मतदारसंघातील शाळांचा या योजनेत समावेश करण्याची केलेली मागणी सकारात्मक असल्याचे नमूद करत, ना. भोयर म्हणाले, कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील शाळांचाही ‘सी.एम. श्री’ योजनेत समावेश करण्यात येईल.

राज्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या या घोषणेमुळे आ.डॉ. अतुल भोसले यांच्या मागणीला यश आले असून, कराड तालुक्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा, तंत्रज्ञानाधारित शिक्षण, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

Related Articles