नगरपालिका हद्दीतही रोजगार हमी योजना लागू करा – आमदार मनोज घोरपडे
राज्य सरकारकडे केली मागणी; मंत्री भरत गोगावले यांचे सकारात्मक संकेत

कराड/प्रतिनिधी : –
ग्रामीण भागापुरती मर्यादित असलेली रोजगार हमी योजना आता नगरपालिका आणि निमशहरी भागातही राबविण्यात यावी, अशी ठोस मागणी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरी भागातील बेरोजगार आणि स्थलांतरित मजुरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रोजगार हमी, विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन’ या राज्यस्तरीय कार्यशाळेत आमदार घोरपडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. या कार्यशाळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, केंद्रीय ग्रामीण विकास विभागाच्या संयुक्त सचिव रोहिणी भाजीभाकरे, राज्यातील विविध मतदारसंघांचे आमदार, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार घोरपडे म्हणाले, रोजगार हमी योजनेमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. मात्र, नगरपालिका क्षेत्रातही रस्त्यांची देखभाल, नालेसफाई, वृक्षारोपण, तलावांचे खोलीकरण, सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची अनेक कामे या योजनेतून करता येऊ शकतात. त्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच शहरांच्या विकासालाही गती मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
नगरपालिका क्षेत्रात वाढती बेरोजगारी आणि स्थलांतरित मजुरांची समस्या गंभीर बनत असल्याचे सांगत, या घटकांनाही रोजगार हमी योजनेचा लाभ मिळणे ही काळाची गरज असल्याचे घोरपडे यांनी अधोरेखित केले. विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल, तर ग्रामीण आणि शहरी भागातील विकासातील दरी कमी करण्यासाठी या योजनेची व्याप्ती वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, आमदार घोरपडे यांनी मांडलेल्या प्रस्तावाची रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि उपस्थित केंद्रीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक दखल घेतली. नगरपालिका व निमशहरी भागात रोजगार हमी योजना विस्तारण्याबाबत शासनस्तरावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.



