सातारा जिल्हाहोम

मसूर पोलीस ठाण्यासाठी ७.७५ कोटींच्या निधीतून नवी इमारत व पोलीस वसाहत

आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश

कराड/प्रतिनिधी : –

कराड तालुक्यातील मसूर पोलीस ठाण्याच्या नव्या प्रशासकीय इमारतीसह पोलीस वसाहतीच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच ई-टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे. कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे.

मसूर पोलीस ठाण्याची विद्यमान इमारत जुनी व अपुरी असल्याने पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. कर्मचाऱ्यांसाठी निवासाचीही पुरेशी व्यवस्था नसल्याने नवीन इमारत व पोलीस वसाहतीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.

या पार्श्वभूमीवर आमदार घोरपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर पोलीस गृहनिर्माण विभागाने ७.७५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबत आमदार घोरपडे यांनी, पोलीस गृहनिर्माण विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली भाईक यांची भेट घेऊन कामाची गती वाढविण्याबाबत चर्चा केली. बैठकीनंतर लवकरच ई-टेंडर प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रकल्पाअंतर्गत आधुनिक सुविधांनी सुसज्ज पोलीस ठाण्याची इमारत उभारली जाणार आहे. तसेच टाइप-२ चे चार व टाइप-३ चे एक शासकीय निवासस्थान, महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा, चौकशी कक्ष आणि नागरिकांसाठी अधिक सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे सांभाळण्यास मदत होणार आहे.

आमदार घोरपडे म्हणाले, मसूर पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीची मागणी अनेक वर्षांपासून होती. पोलीस दलाला सक्षम पायाभूत सुविधा मिळाल्यास नागरिकांना अधिक जलद व दर्जेदार सेवा देता येते. या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून निधीही मंजूर झाला आहे. लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

उंब्रज व बोरगावलाही प्राधान्य

मसूर पोलीस ठाण्याची इमारत व वसाहतीचे काम मार्गी लागल्यानंतर उंब्रज पोलीस स्टेशनची निवासी वसाहत तसेच बोरगाव पोलीस स्टेशनच्या विकासकामांनाही मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार घोरपडे यांनी दिली.

Related Articles