‘कृष्णा’तील ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचे अभिनंदन
कृष्णा कारखाना व सभासदांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

कराड/प्रतिनिधी : –
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनलने सर्व २१ जागांवर दणदणीत विजय मिळवत अभूतपूर्व यश मिळविले. या यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे मुंबईत विशेष अभिनंदन केले.
कृष्णा कारखान्यातील ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा केल्यानंतर आ.डॉ. अतुलबाबा भोसले पावसाळी अधिवेशनासाठी पुन्हा मुंबईत पोहचले. यावेळी विधान भवनातील दालनात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा देत कृष्णा कारखाना, ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्व सभासदांच्या प्रगतीसाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी स्पष्ट ग्वाही दिली. तसेच सहकार क्षेत्रात कृष्णा कारखान्याने केलेली वाटचाल उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनीही आ.डॉ. अतुलबाबांचे अभिनंदन केले. तसेच पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनीदेखील आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांना श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची मूर्ती आणि मानाचे उपरणे देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ, पंढरपूर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, निळोबाराय देवस्थानचे विश्वस्त अशोक सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


