निवडणुकीतील प्रत्येक घोषणा पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध – डॉ. सुरेश भोसले
कृष्णा कारखाना निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी सलग तिसऱ्यांदा सहकार पॅनेलच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत कारखान्याची धुरा पुन्हा एकदा त्यांच्या हाती सोपवली आहे. या विश्वासाला पात्र ठरत निवडणुकीत सभासदांसमोर केलेली प्रत्येक घोषणा पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध राहील, अशी ग्वाही सहकार पॅनेलचे नेते तथा विजयी उमेदवार डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर मतमोजणी केंद्रावर डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी सर्व नवनियुक्त संचालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि अग्रगण्य सहकारी साखर कारखान्यांपैकी एक असून, जवळपास ४५ ते ५० हजार सभासदांची जबाबदारी अत्यंत कसोशीने पार पाडावी लागते. सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला असून तो सार्थ ठरविण्यासाठी अधिक जोमाने काम केले जाईल.
ते म्हणाले, विरोधकांना कारखान्याच्या कामकाजावर किंवा व्यवस्थापनाच्या कारभारावर एकही ठोस आरोप करता आला नाही. राज्यातील सर्वाधिक ऊसदर देण्याचा सातत्याने प्रयत्न, सभासदांना घरपोच साखर वितरण, विविध कल्याणकारी योजना आणि सहकार क्षेत्रातील आदर्श उपक्रम यामुळेच सभासदांचा विश्वास संपादन करण्यात आम्हाला यश आले आहे. निवडणूक झाली नसती तर सभासदांचा कौल स्पष्ट झाला नसता; मात्र या निवडणुकीत त्यांनी विकासाच्या बाजूने निर्णायक मतदान करून व्यवस्थापनावर पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे.
निवडणुकीदरम्यान विरोधकांनी कारखान्याच्या आर्थिक वास्तवाचा विचार न करता अनेक घोषणा केल्या. मात्र कारखान्याच्या प्रगतीवर किंवा कामकाजातील त्रुटींवर भाष्य करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही ठोस मुद्दा नव्हता. सभासदांनी भावनिक प्रचारापेक्षा विकास आणि विश्वासार्हतेला पसंती देत सहकार पॅनेलच्या बाजूने कौल दिला. आता सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक वेगाने काम केले जाईल. निवडणुकीत दिलेल्या सर्व घोषणा टप्प्याटप्प्याने पूर्ण करत कृष्णा कारखान्याचा महाराष्ट्रातील अग्रगण्य कारखाना म्हणून असलेला लौकिक अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे डॉ. सुरेश भोसले यांनी स्पष्ट केले.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही सभासदांचे आभार मानले. ते म्हणाले, सभासदांनी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला अपेक्षेपेक्षाही अधिक मोठे यश दिले आहे. गत निवडणुकीत मिळालेली मोठी आघाडी कायम राखण्याबरोबरच ती वाढविण्याचे आव्हान आमच्यासमोर होते आणि सभासदांच्या पाठबळामुळे ते यशस्वीपणे पेलता आले. कारखान्याचे कार्यक्षेत्र चार तालुक्यांमध्ये विस्तारलेले असून, ५० हजारांहून अधिक सभासद या संस्थेशी जोडलेले आहेत. एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रात सभासदांनी एकतर्फी विश्वास व्यक्त करणे, ही कारखान्याच्या कामकाजाची मोठी पावती असल्याचे त्यांनी नमूद केले. सहकार क्षेत्रात परिपक्व भूमिका घेत राजकारणापलीकडे जाऊन सहकार्य करणाऱ्या सर्व नेत्यांचेही त्यांनी आभार मानले.
ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कारखान्याला सातत्याने सहकार्य लाभले. कारखान्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली विविध कामे त्यांनी तत्परतेने मंजूर केली. तसेच गत अकरा वर्षांत संचालक मंडळाने केलेल्या विकासकामांमुळे कारखान्याची प्रगती साधता आली. यापुढे डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली नवे संचालक मंडळ कारखान्याच्या विकासासोबतच सभासद शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


