सातारा जिल्हाहोम

ना. शिवेंद्रसिंहराजेंचा आनंदराव पाटील यांच्या हस्ते सत्कार

कराडच्या विकासाला गती देणारा ३.४७ किमी लांबीचा सहापदरी उड्डाणपूल वाहतुकीस खुला; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश 

कराड/प्रतिनिधी : –

राष्ट्रीय महामार्गावरील बहुप्रतिक्षित सहापदरी उड्डाणपूल वाहतुकीस खुला झाल्याने कराडच्या विकासाला नवी गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर कराड येथे आलेल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.

कराड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील ३.४७ किलोमीटर लांबीचा सहापदरी उड्डाणपूल नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सुमारे २२२० कोटींच्या महामार्ग प्रकल्पाचा भाग असलेल्या या उड्डाणपुलासाठी अंदाजे ४५० कोटी खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक अधिक सुलभ, सुरक्षित आणि गतिमान होणार असून प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे.

उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे कराड शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, परिसरातील औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक विकासालाही चालना मिळणार आहे.

या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, तसेच कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कराड येथे झालेल्या स्वागत समारंभात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आनंदराव पाटील यांनी सत्कार केला. यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले, मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Related Articles