सातारा जिल्हाहोम

शिक्षण मंडळ, कराडमध्ये ‘गुरुजींची परीक्षा’ उपक्रम उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP २०२०) हे बालवाटिकेपासून उच्च शिक्षण व संशोधनाच्या टप्प्यापर्यंत शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे धोरण आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण मंडळ, कराडतर्फे ‘गुरुजींची परीक्षा’ हा अभिनव उपक्रम नुकताच राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत कराडमधील शिक्षण मंडळाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील एकूण १७५ शिक्षकांनी परीक्षा दिली. या परीक्षेमार्फत शिक्षकांचे राष्ट्रीय शिक्षण धोरणाविषयीचे आकलन, मानसिक तयारी आणि अंमलबजावणीसंदर्भातील दृष्टीकोन समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये सर्वसमावेशकता, गुणवत्तापूर्ण शिक्षण, बहुभाषिकता, कौशल्यविकसन, व्यवसाय शिक्षणाचा समावेश, आणि शिक्षणात लवचिकता यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. धोरणाची उद्दिष्टे सन २०३० पर्यंतच्या शाश्वत विकास ध्येयांशी सुसंगत आहेत. त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने राज्यभर सुरू असून, त्यासंदर्भातील शिक्षकांची तयारी हा एक महत्त्वाचा भाग आहे.

शिक्षण मंडळ, कराडने यापूर्वीही शिक्षकांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणावर आधारित विविध चर्चासत्रांचे आयोजन केले होते. त्या चर्चासत्रांचे पुढील पाऊल म्हणून ही परीक्षा घेण्यात आली. उपक्रमाला शिक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. परीक्षेमुळे शिक्षकांना नव्या धोरणाचे बारकावे समजून घेता आले, तसेच त्यांच्या सैद्धांतिक व व्यावहारिक तयारीचे मूल्यांकन होऊ शकले.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यात प्रथमच ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ विषयक चर्चासत्रासह शिक्षकांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे शिक्षकांमध्ये नवचैतन्य, जागरूकता आणि उत्साह दिसून आला. अशा उपक्रमांमुळे धोरणाच्या अंमलबजावणीत गती येणार असून, शिक्षकांची सकारात्मक मानसिकता व सक्रिय सहभाग निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या यशस्वी उपक्रमामध्ये संस्थेचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले. भविष्यातही अशा उपक्रमांचे नियोजन करून शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे.

 

Related Articles