सातारा जिल्हाहोम

बाळासाहेब पाटील यांचेही जोरदार शक्तीप्रदर्शन 

महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल 

कराड/प्रतिनिधी : – 
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी, त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर आ. बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानापासून दत्त चौकापर्यंत समर्थकांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत भव्य रॅली काढली.
या रॅलीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी बाळासाहेब पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. शिवतीर्थ चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व नियोजन समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी पंचायत समिती सदस्य देवराज पाटील, प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बाळासाहेब पाटील म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने अनेक वर्ष मला सहकार्य केले आहे. याठिकाणी विकासावर आधारित राजकारण करण्यावर आपला नेहमीच भर राहिला आहे. सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची पाठराखण करणारा जिल्हा असून येथील सुज्ञ जनताही यशवंत विचारांची पाठराखण करेल. त्यामुळे याठिकाणी महाविकास आघाडीला निश्चिती यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles