सातारा जिल्हाहोम

कराड दक्षिणमधील रस्ते विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर

डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना यश; ग्रामविकास खात्याची मंजुरी

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिणमधील मुंढे, तारुख, नांदगाव व संजयनगर या भागातील रस्ते विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्यामुळे राज्याच्या ग्रामविकास खात्याकडून या निधीला मंजुरी मिळाली असून, याबाबतचा शासन आदेश नुकताच प्रसारित करण्यात आला आहे.

कराड दक्षिणमधील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करावा, याबाबत डॉ. अतुल भोसले सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यानुसार त्यांनी मुंढे, तारुख, नांदगाव व संजयनगर या भागातील रस्त्यांसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत ग्रामविकास विभागाने ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती लेखाशीर्ष ३०५४-२४१९ अंतर्गत २ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

या अंतर्गत रामा १३६ (जुना) ते विमानतळ मुंढे रस्ता सा.क्र. ०/०० ते १/०० (७० लाख), प्रजिमा ५५ ते तारुख गावठाण रस्ता सा.क्र. ०/०० ते १/०० (५० लाख) आणि नांदगाव ते संजयनगर ते इजिमा १२० पर्यंत रस्ता सा.क्र. ०/०० ते ५/०० (८० लाख) अशी रस्त्यांची विकासकामे केली जाणार आहेत. त्यामुळे या भागातील दळणवळणाला अधिक चालना मिळणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या सहकार्यामुळे आणि डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील विविध विकासकामांसाठी हा निधी मंजूर झाला असून, या विकासकामांना लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. याबद्दल जनतेकडून महायुती सरकारचे आभार मानले जात आहेत.

Related Articles