बनपेठवाडी-येराड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्याला यश; तब्बल 25 गावांतील नागरिकांना मिळणार आरोग्य सुविधा

कराड/प्रतिनिधी : –
बनपेठवाडी-येराड, ता. पाटण येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय नुकताच पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.
या पत्रकात म्हटले आहे की, बनपेठवाडी-येराड परिसरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने येथील रुग्णांना औषधोपचाराठी पाटण व हेळवाकला जावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे यापरिसरातील सर्व गावांतील ग्रामस्थांनी बनपेठवाडी-येराड ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. यासंदर्भात ना. देसाई यांनी उच्चस्तरीय अधिकारी यांच्या बैठका घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना बैठकीत केल्या होत्या.
त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे ना. शंभूराज देसाई यांनी विशेष बाब म्हणून मंजूरी मिळण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार सदर प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजूरी देण्याबाबतचा शासन निर्णय शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच पारित केला.
या गावांना मिळणार आरोग्य सुविधा
बनपेठवाडी-येराडसह जोतिबाचीवाडी, तामकडे, काळोली, दातेगड, टोळेवाडी, मुळगाव, डोंगरुबाचीवाडी, पिंपळगाव, पाटण, नेरळे, मारुल तर्फे पाटण, वाजेगाव, मिरासवाडी, शिरळ, विठ्ठलवाडी, कराटे, मणेरी, चाफेर, काढोली, तळीये, रिसवड, ढोकावळे, झाकडे, लेंढोरी या गावांसह श्री क्षेत्र येडोबा देवाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविक-भक्तांची मोठी वर्दळ असते. या सर्वांना बनपेठवाडी-येराड प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे आरोग्य सुविधा मिळणार आहेत.