‘बळीराजा पाणंद रस्ते’ योजनेला भरघोस निधी देऊ – आमदार डॉ. अतुल भोसले
कराडमध्ये क्षेत्रस्तरीय आढावा बैठक

कराड/प्रतिनिधी : –
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबविण्यासाठी कराड तालुक्यात तयारी सुरू झाली असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिले.
येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी या योजनेच्या अनुषंगाने क्षेत्रस्तरीय समितीची आढावा बैठक पार पडली. बैठकीला कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह पंचायत समिती पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. भोसले म्हणाले, राज्य शासनाने डिसेंबर २०२५ मध्ये सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, कराड तालुक्यात ही योजना दर्जेदार आणि वेगवान पद्धतीने राबविण्यावर भर दिला जाणार आहे. आवश्यकतेनुसार अधिक निधीही मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच तालुक्याला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी दोन्ही आमदार एकत्रितपणे प्रयत्नशील असल्याचे सांगत, निवडणुकीनंतर कोणताही गट-तट न पाहता सर्व प्रतिनिधींना सोबत घेऊन विकासकामे करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांनी कोणताही संकोच न बाळगता पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना दळणवळणाच्या सुविधांमुळे मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



