सातारा जिल्हाहोम

रोहन भाटे यांची सातारा जिल्हा मानद वन्यजीव रक्षक पदी नेमणूक

कराड/प्रतिनिधी : – 

महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार आज राज्य शासनाने जारी केलेल्या शासकीय निर्णयाद्वारे रोहन भाटे यांची सातारा जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून पुढील तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

रोहन भाटे हे बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी चे आजीव सभासद असून पश्चिम घाटातील पक्षीशास्त्र (ornithology) आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या (herpetofauna) अभ्यासात त्यांना तीन दशकांहून अधिक अनुभव असून वन्य प्राण्यांच्या अभ्यासात विशेष प्राविण्य मिळवले आहे .

त्यांनी बिबटे, पक्षी आणि विविध सरपटणाऱ्या प्राण्यांच्या बचाव मोहिमांमध्ये वन विभागाला महत्त्वपूर्ण सहाय्य केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘इंडियन पँगोलिन समिती’चे सदस्य म्हणूनही ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

याशिवाय, केंद्र शासनाच्या वन्यजीव अपराध नियंत्रण बुरो यांच्यासोबत सदस्य म्हणून कार्य करताना त्यांनी वन्यजीव गुन्ह्यांविरोधात टाकलेल्या धाडींमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून अनेक कारवाईतून तब्बल १७५ गुन्हेगारांना अटक करण्यास मदत केली आहे.

‘महाराष्ट्र वन्यजीव कृती आराखड्या’मध्येही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठित अंतराष्ट्रीय ड्यूक ऑफ एडिनबर्ग पुरस्कार सह अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि सक्रिय योगदान लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles