रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी कराडकरांची धाव
सुमारे अडीच हजार नागरिकांचा ‘रस्ता सुरक्षा दौड 2026’मध्ये उत्स्फूर्त सहभाग; शहरात उत्साह, ऊर्जा व सामाजिक बांधिलकीचे वातावरण
कराड/प्रतिनिधी : –
वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वाहनचालना आणि उत्तम आरोग्याचा संदेश देत कराडकरांनी एकत्र येत जबाबदार नागरिकत्वाचे दर्शन घडवले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कराड यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा दौड 2026’ या जनजागृती उपक्रमाला तब्बल अडीच हजार नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘जीवनरक्षा… रस्ता सुरक्षा’ या प्रभावी घोषवाक्याखाली शनिवारी (दि. २८) सकाळी ७ वाजता ऐतिहासिक कृष्णा घाट येथून या दौडीचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत दौडची सुरुवात झाली आणि कराड शहरात उत्साह, ऊर्जा व सामाजिक बांधिलकीचे वातावरण निर्माण झाले. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने यंदा अधिक व्यापक स्वरूप धारण केले.
दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूंमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन ‘दुचाकीस्वार व पादचारी वाचवा’ हा मुख्य संदेश या दौडीद्वारे देण्यात आला. कराड व पाटण तालुक्यांसह सातारा जिल्ह्यातील युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्था व सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग घेत सामाजिक जाणीव जागवली. यावेळी दौडला माजी आमदार आनंदराव पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक प्रविण पवार, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोंम्पे, पोलिस उपाधिक्षक राजश्री पाटील, कराडचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी विजय विभुते, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप सुर्यवंशी, उद्योजक रणजीत पाटील, सचिन पवार, नवनाथ पालेकर, दत्तात्रय देसाई, सतीश वेताळ, गणेश भिसे, अमर शिंदे, भूषण शहा, कुमार ओसवाल, काका देशमुख, दादाराजे देसाई, जीवन सावंत, भरत पवार, शंकर खबाले, रितेश शहा, श्री सचदेव, अॅड. जनार्दन बोत्रे, दिलीप पाटणकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय माधवान, मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, सुदर्शन देवढे, स्वप्निल कदम, सागर विश्वासराव, सुरेश आगवणे, धनंजय हिले, समीर सावंत, शिऱीष पोकळे, संदीप कुंभार, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भारत गोरड, शिवनी सर्ग्रे, शितल घाडगे, रजनी पाटोळे, अनुजा मोहिते, मयुरी रजपूत, श्रद्धा माने, सुरभी घार्गे, जय मोटर्स व कणसे हुंडाईचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात या उपक्रमाचे आयोजन प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वागुले यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे यांच्या समन्वयातून करण्यात आल्याचे सांगत मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांनी, रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांची अंमलबजावणी नसून, ती जीवनरक्षणाची चळवळ आहे. प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांचे प्रमाण लक्षणीय घटेल आणि सुसंस्कृत वाहनचालना संस्कृती विकसित होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच या उपक्रमाद्वारे केलेली दृढ प्रतिज्ञा प्रत्येकाने आयुष्यभर पाळावी. वाहनाच्या संदर्भात आपल्या वागणुकीत अनुकूल बदल होतील, तेव्हाच ही दौड सर्वार्थाने यशस्वी होईल, असे त्यांनी सांगितले. या दौडसाठी कराड प्रशासन, नगरपालिका, पोलीस व वाहतूक पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल, तसेच दौड यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानून त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले.
प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करत, सुरक्षित रस्ते आणि तंदुरुस्त नागरिक हीच प्रगतीची खरी पायाभरणी असल्याचे नमूद केले. रस्ता सुरक्षेसोबत नियमित व्यायाम आणि आरोग्य जपण्याची जाणीव या दौडीमुळे समाजात दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिला आदर्श
या जनजागृती दौडमध्ये केवळ नागरिकच नव्हे, तर प्रशासनातील अधिकारीही सहभागी झाले. कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोंम्पे, कराडचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी सपत्नीक पाच किलोमीटरची दौड पूर्ण करून ‘जे सांगतो ते स्वतः आचरणात आणतो’ हा आदर्श समाजासमोर ठेवला. दौड पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांचाही सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रशासन आणि नागरिक यांची ही एकजूट उपक्रमाच्या यशाची खरी पावती ठरली.
जनजागृतीचा पाच किलोमीटरचा संदेशमय मार्ग
दौडीचा मार्ग हा शहराच्या प्रमुख भागांतून जाणारा आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा होता. कृष्णा घाट – चावडी चौक – मुख्य बाजारपेठ – दत्त चौक – विजय दिवस चौक – कृष्णा नाका – कन्याशाळा मार्गे पुन्हा चावडी चौक आणि कृष्णा घाट असा सुमारे पाच किलोमीटरचा हा मार्ग निश्चित करण्यात आला होता. प्रत्येक सहभागीला विशेष टी-शर्ट, पदक आणि ई-प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती.
विजेते ठरले जनजागृतीचे धावपटू
पाच किलोमीटरच्या स्पर्धात्मक गटात पुरुष व महिला गटात प्रथम तीन क्रमांक जाहीर करण्यात आले. पुरुष गट : प्रथम – अथर्व शंकर ताटे, द्वितीय – धनराज खोत, तृतीय – सुरज शिरतोडे, तर महिला गट : प्रथम – रिया गोंडाळ, द्वितीय – राणी गावडे, तृतीय – धनश्री बुरुड यांनी बाजी मारत प्रथम तीन क्रमांक पटकावले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
रस्ता सुरक्षा व आरोग्य – दुहेरी उद्दिष्ट साध्य
‘रस्ता सुरक्षा दौड 2026’ हा केवळ क्रीडा उपक्रम नव्हता, तर सामाजिक परिवर्तनाची हाक होती. रस्ता सुरक्षा जनजागृतीसह नियमित व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्य यांचा संदेश या माध्यमातून प्रभावीपणे पोहोचवण्यात आला. कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता वाढत असून, सुरक्षित वाहनचालनेची संस्कृती रुजविण्यास निश्चितच हातभार लागणार आहे. सुरक्षित रस्ते, सजग नागरिक आणि सुदृढ समाज या त्रिसूत्रीवर आधारलेली ही ‘रस्ता सुरक्षा दौड’ कराडच्या सामाजिक उपक्रमांच्या इतिहासात एक प्रेरणादायी पर्व ठरली आहे.
पारंपारिक आणि आधुनिक संगीताचा संगम
रस्ता सुरक्षा दौडच्या निमित्ताने उत्साह आणि जनजागृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. आत्माराम विद्यालय, ओगलेवाडी येथील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने आपल्या जोशपूर्ण तालाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. पारंपारिक वाद्यांच्या गजरात सादर झालेल्या लेझीमने स्पर्धकांसह उपस्थित नागरिकांनाही अक्षरशः ठेका धरायला भाग पाडले. नागरिकांनीही मनमोकळेपणाने प्रतिसाद देत या पारंपारिक सादरीकरणाचा आनंद लुटला. याचबरोबर डॉल्बीच्या आधुनिक ठेक्यावर तरुणाईनेही मुक्तपणे थिरकत कार्यक्रमात रंगत आणली.



