सातारा जिल्हाहोम

आर्थिक गुप्तचर यंत्रणा व कराड अर्बन बँकेचा विशेष प्रशिक्षण मेळावा 

कराड/प्रतिनिधी : – 

आर्थिक व्यवहारांमधील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि मनी लॉन्ड्रिंगला आळा घालणे ही सहकारी बँकांची महत्त्वाची जबाबदारी असून त्यासाठी आवश्यक अनुपालन प्रक्रिया अचूक राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या भारत आर्थिक गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी केले.

दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या यांच्या शासनमान्य सेवक प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. १६) येथील शताब्दी सभागृहात नागरी सहकारी बँकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील सुमारे ७० सहकारी बँकांमधील २०० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे उद्घाटन आर्थिक गुप्तचर यंत्रणेचे उपसंचालक रविराज कलशेट्टी, जी. आनंद आणि सल्लागार राजन कान्नोज्जिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कराड अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, माजी अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, उपाध्यक्ष शशांक पालकर, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकात सीए. शिंगटे यांनी मागील पाच वर्षांत चौथ्यांदा असा उपक्रम राबविल्याचे सांगितले. २०२४ मध्ये आर्थिक कृती कार्यबल यांच्या परस्पर मूल्यांकन अहवालात भारताला मनी लॉन्ड्रिंग व दहशतवादी कारवायांसाठी होणाऱ्या वित्तपुरवठ्याला आळा घालण्याबाबत चांगले गुण मिळाल्याचा उल्लेख करून त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे कौतुक केले.

उपसंचालक जी. आनंद यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत नागरी सहकारी बँकांनी करावयाच्या नियमपालन प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन केले. सल्लागार राजन कान्नोज्जिया यांनी बँकांकडून सादर होणाऱ्या अहवालांतील त्रुटी व त्यावरील उपाययोजना स्पष्ट केल्या.

पुणे येथील फिनटेलेक्ट या प्रशिक्षण संस्थेच्या सौ. अर्पिता बेडेकर यांनी आर्थिक गुन्हेगारीचे बदलते स्वरूप आणि त्यासंदर्भातील जोखीम व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. जळगाव जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते.

कराड अर्बन बँकेचे उपमहाव्यवस्थापक सीएस. अमित रेठरेकर यांनी ऑनलाईन अहवाल सादर करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यावर आर्थिक गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सूचना दिल्या.

‘फिननेट २.०’ या अहवाल सादरीकरण प्रणालीसंदर्भात उपसंचालक रविराज कलशेट्टी यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले. प्रलंबित विषय लवकर निकाली काढले जातील तसेच संकेतस्थळाची कार्यक्षमता अधिक सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी मराठीतून उत्तरे दिल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले. सूत्रसंचालन के.वाय.सी. विभागाचे व्यवस्थापक विकास खबाले यांनी केले. उपमहाव्यवस्थापक वैभव गोसावी यांनी आभार मानताना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रशिक्षण उपक्रमांचे सातत्य राखले जाईल, असे नमूद केले.

Related Articles