उंब्रज उड्डाणपुलाचे काम चालू करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता
आमदार मनोजदादा घोरपडे यांची माहिती; महाराष्ट्रातील दोन प्रोजेक्ट्सचा समावेश

उंब्रज/प्रतिनिधी : –
महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग देणारा महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील दोन एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी एकूण २५८.९९ कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथे पारदर्शक उड्डाणपुलाचे काम चालू करण्याचा विषय समाविष्ट आहे.
उंब्रज येथील या प्रकल्पासाठी १३३.४५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्यामध्ये स्लिप रोड व सर्व्हिस रोडचाही समावेश आहे. कागल ते सातारा या सहापदरीकरण प्रकल्पांतर्गत उंब्रज शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी फ्लायओव्हरची मागणी केली होती. अखेर १३ फेब्रुवारी २०२६ रोजी या ब्रिज सेगमेंटल पूलाच्या ट्रेंडरला मंजुरी मिळाली.
एकूण प्रकल्प खर्च १४०.९१ कोटी असून, अंदाजित बांधकाम खर्च १०७.९८ कोटी आहे. उड्डाणपुल पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार असून, १० वर्षे देखभाल कालावधी असणार आहे. उड्डाणपुलाची एकूण लांबी १३०० मीटर (दोन्ही रॅम्पसह) असून मुख्य उंच पूल (Elevated Structure): ८१० मीटररॅम्प: ४९० मीटर (दोन्ही बाजूंनी) आहे. उंब्रज शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन हा एलिव्हेटेड कॉरिडॉर महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
उंब्रज येथील उड्डाणपूलामुळे शहरातील वाहतूक कोंडी पूर्णपणे बंद होणार असून, स्थानिकव्यापारी व नागरिकांना याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर चाफळ उंब्रज-मसूर हा सुद्धा रोड पूर्णत्वास आलेल्या उंब्रज शहरापुरता चारपदरी काँक्रिटीकरण होणार असून, उंब्रजच्या वैभवात भर पडून वाहतूक कोंडीपासून सर्व उंब्रजकरांची सुटका होणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात जाहीर झालेल्या निविदेनुसार केंद्राच्या नियमाप्रमाणे संबंधित सेगमेंटल पुलाच्या कामाला नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळवून वर्क ऑर्डर मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. टेंडर गोपनियतेच्या नियमानुसार लवकरच संबंधित ठेकेदारचे नाव जाहीर होऊन काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. याबाबतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा ट्विट केले आहे.
– आमदार मनोज घोरपडे (कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ)



