सातारा जिल्हाहोम

महायुतीच्या आमदारांच्या विकासकामांनाच सत्ताधाऱ्यांकडून अडथळे – विजय वाटेगावकर

पत्रकार परिषदेत पालिकेतील कारभार, सभागृहातील गोंधळ व विकासकामांवर टीका

कराड/प्रतिनिधी : – 

कराड पालिकेतील सत्ताधारी लोकशाही आघाडी महायुतीतील नगराध्यक्षांच्या माध्यमातूनच महायुतीचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. पालिकेतील कारभार, सभागृहातील गोंधळ आणि विकासकामांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपने पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक शिवाजी पवार, अजय पावसकर, आशुतोष डुबल, किशोरी शिंदे, वर्षा वास्के, सुहास जगताप, सुषमा लोखंडे, एकनाथ बागडी उपस्थित होते.

वाटेगावकर म्हणाले, पालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्येच एकमत नसून त्याचे परिणाम विकासकामांवर होत आहेत. स्वतःचा कारभार सांभाळण्यात अपयशी ठरलेले सत्ताधारी त्याचे खापर विरोधकांवर फोडत आहेत. विरोधी सदस्य नागरिकांचे प्रश्न मांडू लागले की जाणीवपूर्वक गोंधळ घालून त्यांना बोलू दिले जात नाही. शाळा, पाणीपुरवठा, कचरा डेपो, रस्ते व अन्य मूलभूत सुविधांवरील चर्चाही टाळली जाते, असा आरोप त्यांनी केला.

निवडणुकीनंतर अत्यल्प सर्वसाधारण सभा घेण्यात आल्या असून, दोनच सभांमध्ये शेकडो विषय ठेवले गेले. मात्र नगरसेवकांना अभ्यासासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत न देता सभेच्या आदल्या दिवशीच अहवाल देण्यात येत असल्याने सखोल चर्चा होऊ शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

नेकलेस रोड, दैत्यनिवर्तनी मंदिर संरक्षण भिंत, पूरानंतरची पाणीपुरवठा योजना, ब्रिटिशकालीन पूल, कृष्णा नदी संरक्षण भिंत, तसेच अन्य विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला असतानाही त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आणि काही प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मंगळवार पेठेतील सुमारे १.२० कोटी रुपयांच्या उद्यान प्रकल्पालाही विरोध होत असून, उद्यानाऐवजी व्यावसायिक संकुलाची मागणी करून विकासकामांना अडथळा आणला जात असल्याचे ते म्हणाले. नेकलेस रोडसाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, विकासकामांमध्ये राजकारण न करता सर्वांना सोबत घेण्याची त्यांची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles