शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन व सैनिक स्कूल परीक्षेत कोळेवाडी शाळेचा डंका
कराड/प्रतिनिधी : –
कराड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोळेवाडीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, तसेच सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे सत्यजित पवार, शौर्य कानवटे आणि शिवेंद्र पाटील हे तीन विद्यार्थी धारक ठरले. याच विद्यार्थ्यांनी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेतही यश मिळवत प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे. तसेच सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत शौर्य कानवटे शिवेंद्र पाटील व पराग सावंत स्वरा कदम यांनी उल्लेखनीय यश मिळवून सैनिक स्कूलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण देणारी कोळेवाडी शाळा ही कराड तालुक्यातील जिल्हा परिषदेची पहिली शाळा असून विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांतील सातत्यपूर्ण यशामुळे तिचा नावलौकिक वाढत आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, जि.प. सदस्या शैलजा शिंदे, माजी उपसभापती रमेश देशमुख, पंचायत समिती सदस्य अर्जुन कराळे, गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे, विस्ताराधिकारी जमीला मुलानी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

या यशासाठी प्रमोद गायकवाड, शोभाताई चव्हाण, संदीप कोरडे, संध्या शेजवळ, अनिल पाटील आणि मुख्याध्यापक भारती लोकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



