सातारा जिल्हाहोम

ए. आय.द्वारे ऊस उत्पादनवाढीसाठी शासनाने राज्यात प्रायोगिक प्रकल्प राबवावा

आमदार डॉ. अतुल भोसले यांची विधानसभेत मागणी; कृषिमंत्री सकारात्मक

कराड/प्रतिनिधी : – 

राज्यातील ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, सहकारी साखर कारखाने आणि शेतकरी यांना एकत्र घेऊन कृषी विभागाने राज्यात प्रायोगिक प्रकल्प राबवावा, असा प्रस्ताव आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आज विधानसभेत मांडला. याबाबत कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच याप्रश्नी संयुक्त बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिली.

पावसाळी अधिवेशनात राज्याच्या कृषी विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभेत शेतकरी हिताचा महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले, जगभरात कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वेगाने वापर वाढत असून, ए. आय. आधारित तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. महाराष्ट्राच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका असलेल्या ऊस पिकासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असून, यासाठी महाराष्ट्र शासन, सहकारी साखर कारखाने आणि शेतकरी यांना एकत्र घेऊन राज्यात प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात यावा. या प्रकल्पामुळे उसाचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने राज्यात एक नवा प्रयोग होईल आणि त्याचा थेट फायदा लाखो शेतकऱ्यांना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावर उत्तर देताना कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, कृषी विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना अनेक सदस्यांनी विविध सूचना मांडल्या असून, त्या सर्व मुद्द्यांवर कृषी विभाग गांभीर्याने काम करणार आहे. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मांडलेल्या ए. आय. आधारित ऊस उत्पादन वाढीच्या प्रस्तावाची दखल घेत, ऊस पिकामध्ये नवीन संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि ए.आय.चा वापर यासंदर्भात शासन सकारात्मक असून, या विषयावर लवकरात लवकर बैठक आयोजित केली जाईल.

या चर्चेमुळे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने नवे पाऊल पडण्याची शक्यता निर्माण झाली असून, भविष्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत अभ्यासाकांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Articles