सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्यातील ऐतिहासिक विजयानंतर डॉ. सुरेश भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव 

सर्व २१ जागांवर दणदणीत विजय; १४,५०० मतांच्या विक्रमी आघाडी, कारखाना परिसरात जल्लोष 

कराड/प्रतिनिधी : – 

राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष वेधून घेतलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने अभूतपूर्व यश संपादन करत सलग तिसऱ्यांदा सत्तेची पताका फडकावली. तब्बल १४ हजार ५०० हून अधिक मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवत पॅनलने विरोधी संस्थापक पॅनलला जोरदार धक्का दिला.

चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवत कारखान्यावरील आपली पकड अधिक मजबूत असल्याचे सिद्ध केले. निकाल जाहीर होताच कारखाना परिसरासह कराड, वाळवा आणि कडेगाव भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला.

विजयानंतर डॉ. सुरेश भोसले आणि विनायक भोसले यांचे कारखाना कार्यस्थळावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. शुभेच्छा देण्यासाठी सभासद व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसर अभिनंदनाच्या घोषणांनी दुमदुमून गेला.

यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले यांनी या विजयाचे श्रेय सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्याच्या प्रगतीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला दिले. ‘सभासदांनी दाखविलेला विश्वास ही आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. भविष्यात कृष्णा कारखान्याला अधिक सक्षम, आधुनिक आणि राज्यातील आदर्श सहकारी साखर कारखाना बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी नवनिर्वाचित संचालक बाबासो शिंदे, छबन कांबळे, संग्राम पाटील, बाजीराव थोरात, सत्यजित पाटील, बाळासो जगताप यांच्यासह माजी संचालक संजय पाटील, विलास भंडारे, दिलीप पाटील, सुश्मिता जाधव, नंदाताई यादव, शैलजा शिंदे, रोहिणी शिंदे, शिवाजीराव थोरात, राजेंद्र माने, प्रकाश पाटील, प्रकाश देसाई, धनाजी जाधव, रमेश मोहिते, कार्यकारी संचालक सी. एन. देशपांडे, व्यवस्थापकीय संचालक बाजीराव सुतार, एम. के. कापूरकर, तसेच कराड, वाळवा आणि कडेगाव परिसरातील शेतकरी सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles