आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

संघटन कौशल्याला मिळाला सन्मान; धैर्यशील कदम यांना भाजपची विधान परिषद उमेदवारी

 

 

सातारा / प्रतिनिधी : –

भारतीय जनता पक्षाने सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील ज्ञानदेव कदम यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारीची घोषणा होताच सातारा आणि सांगली जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पक्षाच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

धैर्यशील कदम यांनी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना संघटन बळकटीसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी प्रभावी नियोजन, कार्यकर्त्यांचे संघटन आणि प्रचार यंत्रणा सक्षमपणे उभी केली होती. त्याचा परिणाम म्हणून सातारा जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. या यशामागे त्यांची संघटन कौशल्ये आणि कार्यकर्त्यांशी असलेला दृढ संपर्क महत्त्वाचा मानला जातो.

गेल्या काही महिन्यांपासून धैर्यशील कदम यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. मंत्री गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी केलेल्या कार्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे बोलले जात आहे.

राजकारणाबरोबरच उद्योग क्षेत्रातही धैर्यशील कदम यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वर्धन ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून त्यांनी कृषी प्रक्रिया, बांधकाम, पेट्रोलियम व्यवसाय आणि साखर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे प्रशासन, उद्योग आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांचा अनुभव असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

भाजपने सांगली-सातारा मतदारसंघात धैर्यशील कदम यांच्या रूपाने संघटनात्मकदृष्ट्या सक्षम आणि अनुभवी उमेदवार मैदानात उतरविला असल्याची चर्चा आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून केलेल्या दीर्घकालीन कार्याची ही योग्य दखल असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. उमेदवारी जाहीर होताच दोन्ही जिल्ह्यांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक आता अधिक रंगतदार होणार असून धैर्यशील कदम यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या विजयाच्या आशा अधिक बळकट झाल्याची प्रतिक्रिया राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles