अजितदादा पवार यांच्या निधनाने सहकार चळवळीची हानी : डॉ. सुरेश भोसले
कृष्णा कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
कराड/प्रतिनिधी : –
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या सहकार चळवळीची मोठी हानी झाली आहे. असे प्रतिपादन य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
कृष्णा कारखान्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, संजय पाटील, बाजीराव निकम, सयाजी यादव, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, मनोज पाटील, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, एम.के.कापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
चेअरमन डॉ.सुरेश भोसले पुढे म्हणाले, अजितदादा पवार हे एक अतिशय परखड बोलणारे नेते, जिद्दीने काम करणारे, ग्रामीण भागातील लोकांच्या इच्छा आणि समस्या ओळखणारे असे एक सामान्य घरातून तयार झालेले नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.अजितदादा यांचे सहकार चळवळीत आणि साखर कारखानदारीत मोठे योगदान होते. सहकार चळवळ व साखर कारखानदारीचा पूर्ण आधार गेल्या सारखी परिस्थिती झालेली आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्यावतीने, संचालकांच्यावतीने या भागातील सर्व लोकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करत आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. अशी भावना डॉ. भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.
व्हाईस चेअरमन जगदीश जगताप म्हणाले,अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्याचे कधीही भरुन न निघणारी हानी झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील उत्तम प्रशासक, दिलखुलास माणूस, एक धडाडीचे, कार्यक्षम आणि स्पष्ट वक्ते नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक आणि सहकारी क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबियावर कोसळलेल्या दुःखामध्ये य.मो.कृष्णा सह. साखर कारखान्यासह कृष्णा उद्योग समुहातील सर्वच पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी सहभागी आहोत. कारखाना कार्यस्थळावर श्रद्धांजली प्रसंगी सभासद, खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


