सातारा जिल्हाहोम

कृष्णा पुलावरील आत्महत्यांना आळा घालण्यासाठी बेमुदत उपोषण

संरक्षक जाळ्या बसवण्याची मनोज माळींची मागणी; राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अद्यापही दिरंगाई

कराड/प्रतिनिधी : –

कराड शहरालगत असलेल्या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा पुलावर घडणाऱ्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली असून, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रक्षक प्रतिष्ठाणचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी मंगळवारपासून येथील प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

कृष्णा पुलावरील संरक्षक कठड्यांची उंची अपुरी असल्याने महिलांना व युवतींना सहज पुलावरून नदीत उडी मारणे शक्य होत असून, याच कारणामुळे गेल्या काही वर्षांत अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक जाळ्या बसवाव्यात, ही मागणी रक्षक प्रतिष्ठाणकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी या मागणीसाठी रक्षक प्रतिष्ठाणने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून सुमारे ४३ लाख रुपयांचा खर्चाचा प्रस्ताव तयार केला होता. या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनीही संरक्षक जाळ्या बसवण्याबाबत संबंधित विभागाला पत्राद्वारे सूचना केल्या होत्या. मात्र, प्रस्ताव असूनही आजतागायत जाळ्या बसवण्यात आलेल्या नाहीत.

दरम्यान, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका युवतीने कृष्णा पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात मनोज माळी यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

उपोषण सुरू झाल्यानंतर काही तासांतच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत, प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले. मात्र मंजुरीचे अधिकृत पत्र मिळेपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज माळी यांनी घेतली आहे.

कृष्णा पुलाला ‘सुसाईड पॉईंट’ अशी दुर्दैवी ओळख मिळू लागल्याने सामाजिक चिंता वाढली आहे. महिलांच्या आत्महत्यांचे सत्र थांबावे यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देत ॲड. पद्मजा लाड व ॲड. मिलिंद लाड यांनी उपोषणस्थळी धरणे आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांत मंजुरीचे पत्र मिळाले नाही, तर आपणही मनोज माळी यांच्यासोबत बेमुदत उपोषणात सहभागी होणार असल्याचा इशारा ॲड. लाड दाम्पत्याने दिला आहे.

Related Articles