‘व्हिजन मलकापूर 2026’ – मनोहर शिंदे
मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सातत्याने यशस्वीपणे राबविणारे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हे आज विकासशील नेतृत्वाचे प्रभावी प्रतीक ठरले आहेत. २४ तास नळ पाणीपुरवठा योजनेनंतर आता २०२६ पर्यंत २४ तास घरगुती गॅसपुरवठा, घर तिथे सोलर, तसेच पालिकेच्या भव्य नवीन इमारतीचे काम अशा पथदर्शी योजनांमुळे मलकापूरचे नाव देशपातळीवर पोहोचले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.

सत्तेला विवेकशीलता, अधिकाराला अभ्यास, सहकाराला सार्वमत, अर्थकारणाला पारदर्शकता, शिक्षणाला ज्ञान, श्रद्धेला विज्ञान, कृतीला आधुनिकता आणि वंचितांना आपुलकी देण्याचा संकल्प मनोहर शिंदे यांनी केला आहे. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या संतवचनाप्रमाणे विनयशील, संयमी व समन्वयात्मक व्यक्तिमत्त्वामुळे ते नगरपालिका कर्मचारी व सामान्य नागरिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. वडील स्व. भास्करराव शिंदे व आई रत्नमाला शिंदे यांच्या संस्कारातून समाजसेवेचा वारसा लाभलेले मनोहर शिंदे यांनी आयुष्याचा मोठा काळ लोककल्याणासाठी वाहिला आहे. कार्यकर्त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणे, चुकलेल्यांना संधी देणे, नडलेल्या-अडलेल्यांना तातडीने मदतीचा हात देणे ही त्यांची कार्यपद्धती आहे. नवनवीन संकल्पना, जिज्ञासा व चिकाटीमुळे मलकापूरसाठी कोट्यवधींचा निधी मिळवून विविध योजना सातत्याने सुरू ठेवण्यात ते यशस्वी ठरले.
राज्यात व केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी, मुंबई-दिल्लीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मंत्र्यांकडून मलकापूरसाठी भरघोस निधी मिळवला. शहराचा विकास हाच एकमेव ध्यास घेऊन ते दररोज न चुकता नगरपालिका कार्यालयात उपस्थित राहतात. शिक्षण, संस्कृती व महिलांसाठी आपुलकीने सहकार्य करत प्रियदर्शनी कन्यारत्न योजना, श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्यासुरक्षा अभियान, महात्मा गांधी दिव्यांग पेन्शन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, हरित मलकापूर कंपोस्ट प्रकल्प, ग्रीन सिटी वृक्षसंवर्धन, शेती औजार बँक यांसारख्या नाविन्यपूर्ण योजना त्यांनी यशस्वी केल्या. केवळ विरोधासाठी विरोध न करता, विकासासाठी विरोधकांनाही सन्मान देण्याची लोकशाही परंपरा त्यांनी जोपासली. मलकापूर ग्रामपंचायत ते नगरपालिका असा प्रवास करत असताना ODF, ODF++, स्वच्छ सर्वेक्षण, नॅशनल वॉटर अवॉर्ड, वॉटर+ मानांकन अशा राष्ट्रीय पुरस्कारांनी शहराचा शिरपेच उंचावला आहे. महामार्गावरील युनिक कॉलम-आधारित उड्डाणपूल, मार्केटयार्ड-नांदलापूर रस्ता, झोपडपट्टीमुक्त मलकापूरचे स्वप्न, तसेच २४ तास गॅसपुरवठ्याचे व्हिजन हे त्यांच्या दूरदृष्टीचे ठोस उदाहरण आहे.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. भविष्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, तसेच मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सहकार्याने मलकापूरच्या विकासासाठी अधिक निधी आणण्याचा त्यांचा निर्धार आहे. संयमी स्वभावामुळे सर्वांचे ‘भाऊ’ ठरलेले मनोहर शिंदे आज मलकापूरच्या विकासाचे विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत.
– आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व मनोहर शिंदे मित्रपरिवार (मलकापूर)



