मलकापुरात दुबार मतदारांच्या सर्वेक्षणासाठी १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान गृहभेट
कराड/प्रतिनिधी : –
मलकापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली आहे. त्यानुसार ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, एकूण २५,१७४ मतदारांपैकी ५५५ मतदारांची नावे संभाव्य दुबार मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने २९ ऑक्टोबर २०२५ रोजी संभाव्य दुबार नावांच्या तपासणीसंदर्भात विशेष आदेश निर्गमित केले आहेत. त्या अनुषंगाने मलकापूर नगरपालिका क्षेत्रातील या ५५५ संभाव्य दुबार मतदारांच्या पडताळणीसाठी केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे दि. १२ ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत मतदारांच्या राहत्या घरी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. या गृहभेटीदरम्यान अधिकाऱ्यांकडून संबंधित व्यक्तींकडून आवश्यक माहिती घेण्यात येणार असून, मतदाराने प्रत्यक्ष कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबतची नोंद परिशिष्ट क्रमांक १ मध्ये करण्यात येईल.
सदर गृहभेटीच्या काळात मतदारांनी घरी उपस्थित राहून BLO अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षण प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे यांनी मतदारांना आवाहन केले आहे.



